कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे मंत्रीपद धोक्यात ? ‘त्या’ प्रकरणी कोर्टाने दिले हे आदेश
छ.संभाजीनगर दि:-13. एकीकडे मंत्रीमंडळाचा विस्तार व खातेवाटप यावरून रात्रंदिवस माथापच्ची सुरू असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मोठं संकट येऊ घातलय. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाने दणका दिलेला असून त्यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्थावर मालमत्तांसंबंधी खोटी माहिती दिल्याचा आरोप सत्तार यांच्याविरोधात होता, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सिल्लोड दिवाणी न्यायालयात याप्रकरणाची खटला चालवण्याचे आदेश दिले गेले आहेत. निवडणूक प्रतिज्ञपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी 2021मध्ये ही याचिका दाखल केलेली होती.त्यावर आता सुनावणी सुरू झालेली आहे.
ही याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. यानंतर याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले गेले होते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड न्यायालयाने CRPC act 204 अन्वये प्रोसेस जारी केली . त्यामुळे अब्दुल सत्तर यांना आता सिल्लोड कोर्टात हजर राहावं लागणार आहे. या कायद्यानुसार हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांच आमदारकीसह मंत्रीपदही जाऊ शकते. इतकंच नाही तर ते 6 वर्ष निवडणूक लढण्यासही अपात्र ठरतील.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सन 2014 आणि 2019 सिल्लोड व सोयगाव विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे.यात स्थावर मालमत्तांमध्ये शेत जमीन ,बिगर शेतजमीन,वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शिक्षण विषयी खोटी माहिती दिल्याचं प्रकरण 2021 साली दाखल करण्यात आलेलं होतं. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी याचिका दाखल केली होती. सत्तार यांनी संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचं चौकशी अंती आता पोलीस तपासात उघड झालं आहे.