आता प्रत्येक शासकीय पत्रव्यवहारात झळकणार 350 वा शिवराज्याभिषेकाचे विशेष बोधचिन्ह
मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण झालेली आहे. यानिमित्त राज्य राज्यसरकारच्यावतीने वर्षभर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. ऐतिहासिक किल्ले रायगडावर 2 जून रोजी शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याला मोठ्या दिमाखात सुरवात झाली. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने विशेष टपाल तिकीट काढले आहे. त्यानंतर आता राज्यसरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज’ शब्द चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराज याना जगभरात ओळखले जाते. त्यांचा विचार जगभरात जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा निश्चय राज्य शासनाने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीतील शिवराज्याभिषेक हा सर्वासाठी प्रेरणादायी दिवस आहे.
शिवाजी महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ आदी प्रत्येक गोष्ट प्रेरणादायी आहेत. या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी राज्य सरकारने आता शासकीय कार्यक्रम आणि शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस तथा शिवप्रेमी आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी या उद्देशाने “३५० वा शिवराज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले.
350 वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त लोकार्पण करण्यात आलेल्या या विशेष बोधचिन्हाचा शासनाच्या सर्व शासकीय कार्यक्रमाच्या प्रचार/प्रसिध्दीत तसेच शासकीय पत्रव्यवहारांत कटाक्षाने वापर करण्यात यावा असे आदेश राज्यसरकारने जारी केले आहेत. हे बोधचिन्ह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात चित्रित करण्यात यावे. सर्व मंत्रालयीन आणि प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना सदर बाब निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना प्रसारीत कराव्यात, असा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.