मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्यक्ती व संस्थांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे पुरस्कार प्रदान
सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र ही राष्ट्रसंत, समाजसुधारक आणि कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतुनच देशाला सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत आहे. आपले राज्य पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणुक यामध्ये देशात अव्वल असून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशात व राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित कारभार सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2019-20 ते 2022-23 या कालावधीत देण्यात येणारे विविध पुरस्कार आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांना प्रदान करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत गोगावले, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आदी उपस्थित होते.
समाजाच्या शोषित, वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासन करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाने सामाजिक न्याय विभागासाठी सर्वात जास्त 21 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण सोडावे लागू नये म्हणून शिष्यवृत्ती व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येतात. शिष्यवृत्तीसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करून महामंडळाला एक हजार कोटीचे भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी देशात पहिल्यांदाच आपल्या राज्यात दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला आहे. लाड समितीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या शिफारसी लागू करण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगार, प्रशिक्षण व संशोधनासाठी बार्टी संस्था काम करीत आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येत आहे. परदेशातील उच्च शिक्षणासाठीसुद्धा मदत करण्यात येत आहे.
लंडनमधील डॉ. बाबासाहेब वास्तव्यास असलेल्या घराचे स्मारकात रूपांतर केले.मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू आहे. राज्यात रमाई आवास योजनेतून साडेचार लाख घरकुल बांधण्यात आली आहेत. शासनाने नागरिकांना योजनांचा लाभ त्यांच्या जवळ जावून देण्याचे ठरविले आणि शासन आपल्या दारी कायर्क्रम राबविण्यात आला. आतापर्यंत 20 कार्यक्रमांमधून 4 कोटी 60 लाख लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोकाभिमुख बनला आहे. हे शासन आपत्तीमध्ये धावून जात आपत्तीग्रस्त लोकांचे दु:ख दूर करण्याचे काम करीत आहे, असे सांगून पुरस्कारार्थींचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले आहे. गेल्या चार वर्षाचे प्रलंबित असलेले 393 पुरस्कार आपण देत आहोत. पुरस्कार नवीन काम करण्याची ऊर्जा देतात. पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या कामाची प्रेरणा अन्य घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे समाजाच्या जडण – घडणीत अनुकूल परिणाम दिसून येतो, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांवेळी म्हणाले.
यावेळी ठाण्यातील कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचे दुरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात सचिव सुमंत भांगे यांनी पुरस्कार व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली.
सामाजिक न्याय विभागाला पर्याप्त निधी देण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार
समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा शासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. समाजातील मागास, वंचित घटकाचे कल्याण करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत असते. या समाज घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाकरिता सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. त्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असते. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाला पर्याप्त निधी देण्याचा नेहमी प्रयत्न असतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विविध योजनांमध्ये बोगस लाभार्थी किंवा बनावट पद्धतीने लाभ प्राप्त करून घेण्याचे प्रकार यापूर्वी निदर्शनास येत होते. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात त्यांच्या लाभाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, निश्चितच शासनाच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्याला मिळत आहे. कोविडच्या कालावधीमुळे राहिलेले मागील चार वर्षापासूनचे सर्व पुरस्कार आज आपण एकत्रितपणे प्रदान करीत आहोत. राज्यात अनुसूचित जाती घटकाची लोकसंख्या 1.32 कोटी आहे. या समाज घटकाकरिता 13 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. पुरस्कार महामानवांच्या नावाने देण्यात येत आहे. त्यांना यापुढे महामानवांच्या पुरस्कारार्थी नावाने ओळखण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच पुरस्कारार्थी व्यक्तींची जबाबदारी वाढली आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
पुरस्कारांचे मानकरी
या सोहळ्यात वैयक्तिक व संस्था पातळीवर एकूण 393 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यापैकी प्रातिनिधीक स्वरूपात 14 पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार :
वैयक्तिक स्तरावर – बापूसाहेब कांबळे (जि. कोल्हापूर), शिवाजी गवई (जि. जालना), कृष्णाजी नागपुरे (चंद्रपूर).
संस्था स्तरावर- श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण जि. सातारा, पब्लिक वेल्फेअर सोसायटी जि. नागपूर.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार :
वैयक्तिक स्तरावर – पोपटराव साठे (जि. अहमदनगर), रावसाहेब कदम (जि. ठाणे),
संस्था स्तरावर- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर,
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार :
वैयक्तिक स्तरावर- धोंडीरामसिंह राजपूत छत्रपती संभाजीनगर,
संस्था स्तरावर- क्रांतीसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हाडगा ता. निलंगा जि. लातूर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार :
संस्था स्तरावर – कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्वोदय वसतिगृह कासेगाव ता. वाळवा जि. सांगली,
शाहू फुले आंबेडकर पारितोषिक :
संस्था स्तरावर – सतचिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ
संत रविदास पुरस्कार :
वैयक्तिक स्तरावर – श्वेता दाभोळकर ठाणे.
संस्था स्तरावर – शिवकृपा समाज सेवा मंडळ लातूर