एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा, बनावट चकमक प्रकरण भोवले
मुंबई, दि-१९, तब्बल ३१२ एन्काउंटर प्रकरणांमध्ये १४५ गुंडांचे एन्काऊंटर करून देशातील सर्वोत्तम एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ख्याती मिळविलेले माजी आयपीएस पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना लखनभैया बनावट चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने शर्मा यांना दोषी ठरवले आणि इतर १२ दोषींप्रमाणेच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
२००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसातील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून राजकारणात पाऊल ठेवले होते. मात्र राजकारणात त्यांना अपयश आले.
काय होतं नेमकं प्रकरण?
पोलिसांनी ११ नोव्हेंबर २००६ रोजी अंधेरीतील सात बंगला येथे रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैयाची बनावट चकमकीत हत्या केली होती. रामनारायणचे वकील असलेले भाऊ अॅड. रामप्रसाद गुप्ता यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एसआयटीने चौकशीअंती खटला भरला. त्यानंतर सुनावणीअंती सत्र न्यायालयाने सन २०१३मध्ये ११ पोलिसांसह २१ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तर प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवले होते. शर्माला निर्दोष ठरवण्याच्या निर्णयाविरोधात रामप्रसाद गुप्ता आणि राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात अपील केले होते; तर दोषी ११ पोलिसांनी जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अपील केले होते. याविषयीच्या एकत्रित सुनावणीअंती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता; तो आज, मंगळवारी खंडपीठाने जाहीर केला. अंडरवर्ल्डमधील गुंडांसहित लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांनाचाही त्यात समावेश आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आणि डी. कंपनीच्या इशाऱ्यावर एन्काउंटर करत असल्याचा शर्मा यांच्यावर आरोप झाला होता.
Credit -times group