भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर
पत्र्याच्या घरात राहणारा आमदार राम सातपुते
मुंबई दिनांक 24 मार्च, भाजपने आपली लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलेली असून महाराष्ट्रातील तिसरी यादी आता जाहीर केलेली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या राम सातपुते यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपने माळशिरसमधून उमेदवारी दिली. विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा अवघ्या 2590 मतांनी पराभव करून सातपुते विधानसभेत पाहोचले. विधिमंडळात आक्रमक भाषण, आंदोलनांमुळे ते कायम चर्चेत असतात. पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुते हे आता लोकसभेच्या रिंगणात तीनदा आमदार असलेल्या प्रणिती शिंदेचा मुकाबला करतील.
माळशिरस तालुक्यातील आमदार राम सातपुते यांना भाजपने सोलापूर लोकसभा या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केलेली आहे. अगदी कमी कालावधीत आमदार ते थेट आता खासदारकीचे तिकीट मिळाल्याने राम सातपुते यांच्या कार्याची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतल्याचे दिसून येत आहे. सातपुते हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातूनही पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी देण्यात आली आहे. सुनील मेंढे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते गेले पाच वर्षे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तर अशोक नेते यांची ही लोकसभा निवडनुकीची तिसरी वेळ आहे. अशोक नेते गेले दहा वर्ष गडचिरोलीचे खासदार आहेत.
भाजपने आज जाहीर केलेल्या 111 भाजप उमेदवारांमध्ये तीन उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. भाजपची ही महाराष्ट्रातील तिसरी यादी आहे.
भंडारा-गोंदिया – सुनील बाबुराव मेंढ
गडचिरोली-चिमूर – अशोक महादेवराव नेते
सोलापूर – राम सातपुते