राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता ! महाविकास आघाडीत बिघाडी ? शरद पवारांचे विचारमंथन ?
शरद पवार नाराज असल्याची माहिती
मुंबई -दिनांक 27 मार्च, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आलेली असून आतापर्यंत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज सकाळी आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून घेतलेली आहे. उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट दिलं आहे. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे ते सुपूत्र आहेत. गजानन किर्तीकर हे एकनाथ शिंदे गटासोबत आहेत आणि मुलगा अमोल किर्तीकर उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत. अमोल किर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्याने कॉंग्रेस नेते संजय निरुपम चांगलेच संतापले आहेत. निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी होती.
आज पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची नाराजी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवली. ”खिचडी चोर उमेवारासाठी मी प्रचार करणार नाही”, अशा शब्दांत निरुपण यांनी हल्ला चढवला आहे. तसेच ही बाब संजय निरुपम यांनी थेट दिल्लीतील काँग्रेसच्या हाय कमांड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कडे मांडल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलेला आहे.
तर दुसरीकडे सांगली लोकसभेची जागा काँग्रेस लढवण्यासाठी इच्छुक असताना त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांना एकतर्फी उमेदवारी जाहीर करताना स्थानिक काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप आमदार विश्वजीत कदम यांनी केलेला आहे. विश्वजित कदम हे स्वतः काँग्रेसच्या तिकिटावर सांगलीच्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्यातही धुसफूस सुरू झालेली आहे. या नाराजी नाट्याच्या सर्व गोष्टी शरद पवार यांच्या कानावर आल्याने आज राष्ट्रवादीच्या बेलार्ड इस्टेट येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत या घडलेल्या घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. ठाकरे गटाने एकतर्फी निर्णय घेऊन मित्र पक्षांना नाराज केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. ठाकरेंनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे शरद पवार नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. महाविकास आघाडीला संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकत्र जागावाटपाची घोषणा जाहीर करायला हवी होती.असे आज झालेल्या बैठकीत शरद पवार म्हणाल्याची माहिती समोर आलेली आहे. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागलेली आहे.
तसेच राज्यातील काँग्रेसच्या नाराज झालेल्या पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, संजय निरुपम आणि विश्वजीत कदम या वरिष्ठ नेत्यांनी येत्या काळात हा वाद न मिटल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा आहे. याचाच अर्थ हा वाद आणखी चिघळल्यास शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी काडीमोड घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेस घेऊ शकते. आणि तसा निर्णय काँग्रेसने घेतल्यास उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांवर उमेदवार उभे करण्यासाठी चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. उद्धव ठाकरे गटाने आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना विश्वासात न घेता जाहीर केलेल्या यादीवर शरद पवारांनी संशय व्यक्त केल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान याच विषयावर दिवसभर खात्याकूट झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आपल्या उमेदवारांची अजूनही घोषणा केलेली नसल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांनी दिलेली आहे. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील हा जागावाटपाचा वाद तात्काळ मिटवण्यासाठी शरद पवार यांनी आजच स्वतः पुढाकार घेतल्याचीही माहितीही सूत्रांनी दिलेली आहे. कारण महाविकास आघाडी विस्कटल्यास त्याचा फायदा थेट भाजपला होणार आहे. यावर आता काय निर्णय होतो ते रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे.