भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात मुंबईत ” भूकंप पे चर्चा “
यावल परिसरात राहणार भूकंपाचा केंद्रबिंदू ?
जळगाव- दि:५ एप्रिल , जळगाव जिल्ह्यात मोठा ‘भूकंप’ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यावल तालुका हा या संभाव्य भूकंपाचे केंद्रबिंदू राहणार असून यावल पासून ४०किलोमीटर पर्यंत असणाऱ्या परीसरात या भूकंपाचे हादरे बसणार असल्याची शक्यता ‘भूगर्भ’ तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. हा संभाव्य ‘भूकंप’ ९ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत भाजपचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवानेते आमदार रोहित पवार यांची दक्षिण मुंबईत योगायोगाने भेट झाली असता त्या दोघांमध्ये या संभाव्य भूकंपाची ‘तीव्रता‘ आणि ‘परिणाम ‘ या विषयावर सखोल चर्चा झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे.
स्वतः अमोल जावळे हे यावल तालुक्यातील रहिवासी असल्याने ते सुद्धा ‘भूकंप पिडित‘ राहणार आहे. अशातच या भागातील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात काही आतापासूनच काही तरी ठोस पावले उचलून उपाययोजना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.
भूकंप ‘पिडीतांना’ आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘पवार’ कुटुंबाची मोठी परंपरा आणि ख्याती असल्याने अमोल जावळे आणि रोहित पवार जरी राजकीय विरोधक असले तरी ‘भूकंपग्रस्तांच्या’ पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका निभविण्यासाठी ‘पवार’ कुटुंबातील सदस्य नेहमी सज्ज असल्याची ग्वाही रोहित पवारांनी अमोल जावळेंना दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे.