रवींद्रभैया पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे रावेर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात अंतर्गत धुसफूस ?
जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या प्रल्हादराव पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे.
यापूर्वी श्रीराम दयाराम पाटील यांनी देखील काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे एक व सोबत आणखी तीन वेगवेगळे फार्म जोडून काल अर्ज दाखल केलेले होते. आता स्वतः राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील यांनी आज अर्ज दाखल केल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आलेले आहे. यापूर्वी रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी शरद पवारांचे अत्यंत निष्ठावंत असलेले रवींद्र भैय्या पाटील यांना डावलून आयत्या वेळी भाजपातून आलेले श्रीराम दयाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अशातच आज अचानक रवींद्र भैय्या पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात काही अंतर्गत राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत का ? रवींद्रभैय्या पाटील यांना डावलले गेल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही धुसफूस सुरू झालेली आहे का ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. आज दुपारी अचानक घडलेल्या या सर्व घडामोडींवरून अंदाज लावला जात आहे की, राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेले श्रीराम दयाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे का ? अशा चर्चांना रावेर लोकसभा मतदारसंघात उधाण आलेले आहे.
दरम्यान,काल ‘श्रीराम पाटील’ नावाच्या तीन वेगवेगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. रावेर लोकसभा मतदारसंघात तो सुद्धा एक चर्चेचा विषय बनलेला आहे.