क्राईम/कोर्टपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

ट्रेनी आयएएस पूजा खेडकर वर यूपीएससीने केला गुन्हा दाखल, कारणे दाखवा नोटीसही बजावली

मायबाप नंबरी बेटी दस नंबरी

IAS puja khedkar नवी दिल्ली: दि-१९ जुलै , गेल्या काही दिवसांपासून आपल्या बनवाबनवीने चर्चेत असलेल्या खोटी ओळख व प्रमाणपत्रं दाखवून आयएएसची परीक्षा देणाऱ्या व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होताच गैरवर्तन करणाऱ्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) मोठा दणका दिला आहे. यूपीएससीनं तिच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल केला असून नागरी सेवा परीक्षा -२०२२ मधील तिची उमेदवारी रद्द का करू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भविष्यात तिला पुन्हा परीक्षा देण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.


पूजा खेडकर (puja khedkar) ही २०२२ च्या बॅचची महाराष्ट्र केडरची आयएएस अधिकारी आहे. परीक्षा पास झाल्यानंतर ती प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाली होती. प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर ती अधिकारांचा गैरवापर करत होती. लाल दिव्याची खासगी ऑडी गाडी घेऊन फिरताना ती आढळली होती. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला न मिळणाऱ्या सुविधांची मागणी तिनं केली होती. ह्या सगळ्याची चर्चा झाल्यानंतर तपासात अनेक गोष्टी पुढं आल्या. त्यानंतर यूपीएससीनं तिची चौकशी सुरू केली.

यूपीएससीच्या चौकशीत अनेक बाबी पुढं आल्या. स्वत:चं नाव, वडिलांचं व आईचं नाव, छायाचित्र, स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक, पत्ता बदलून आणि स्वत:ची ओळख लपवून तिनं नियमबाह्य पद्धतीनं अनेक वेळा आयएएसची परीक्षा दिल्याचा आरोप आहे. तसंच तिनं जातीचं व अपंगत्वाचं बनावट प्रमाणपत्र देऊन परीक्षा दिली होती, असंही तपासात पुढं आलं आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी अजूनही वाशिमचे शासकीय विश्रामगृह सोडलं नसल्याची माहिती समोर आलेली असून परवा तिच्या आईला पुणे पोलिसांनी बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी तसेच रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेलमधून इंदूबाई नावाने बनावट आधारकार्ड बनवून राहत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे मायबाप नंबरी बेटी दस नंबरी असा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

युपीएससीच्या निवेदनात काय ? केंद्रीय लोकसेवा आयोग घटनात्मक आदेशाचं काटेकोरपणे पालन करतो. कोणत्याही तडजोडीशिवाय सर्व परीक्षा व सर्व प्रक्रिया पार पाडतो. यूपीएससीनं आपल्या सर्व परीक्षा प्रक्रियेचं पावित्र्य निष्पक्षतेनं आणि नियमांचं काटेकोर पालन करून जपलं आहे. त्यामुळंच जनतेचा व विद्यार्थ्यांचा यूपीएससीवर विश्वास आहे. ही विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं आयोगानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या अध्यक्षतेखालील सामान्य प्रशासकीय विभागानं (GAD) गुरुवारी (१८ जुलै) खेडकर यांच्यावरील अनेक आरोपांबाबतचा अहवाल केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाला (डीओपीटी) सादर केला. या प्रकरणाची चौकशी करणारे अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्राच्या एक सदस्यीय समितीकडे हा अहवाल पाठविण्यात आला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button