ऐतिहासिक मुंबादेवी परिसराचा कायापालट करण्यासाठी विकास आराखडा तयार करावा – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई दि. ११ : दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मंदिर आणि परिसर हा एक ऐतिहासिक आणि अनेक दृष्टीने महत्वपूर्ण असा विभाग आहे. त्याचे नूतनीकरण आणि पुनर्विकास करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने बृहद आराखडा तातडीने तयार करावा. विद्यमान विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिले.
विधान भवनातील अध्यक्ष यांच्या दालनात मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ५ एकर पेक्षा मोठा परिसर असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, मंदिराची स्वच्छता आणि सुशोभीकरण यांना प्राधान्य देणे, रस्त्याचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी टाळणे, फार मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेला ३०० वर्षांपासूनचा सोने आणि सराफा बाजार याला आकर्षक नवीन स्वरुप देणे इत्यादी बाबींवर सविस्तर चर्चा झाली. पुनर्विकासासाठीचा आराखडा करताना परिसरातील मुंबादेवी मंदिर ट्रस्ट, श्री मुंबादेवी दागिना बाजार असोसिएशन, इंडिया बुलीयन ॲड ज्वेलर्स असोसिएशन, कामनाथ मंदिर ट्रस्ट आणि अन्य छोट्या-मोठ्या व्यापारी आस्थापनांना विश्वासात घेतले जावे, असे निर्देशही ॲड. नार्वेकर यांनी दिले.
या बैठकीत प्रस्तावित नूतनीकरण संदर्भात सादरीकरण करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, सी-वार्ड चे उद्धव चंदनशीवे, माजी नगरसेवक जनक संघवी, अभियंता मनिष पडवळ, वास्तुविशारद अविनाश वर्मा, मुंबादेवी ट्रस्टचे चंद्रकांत संघवी, राजीव चोकसी, हेमंत जाधव, दागिने व्यापारी पृथ्वीराज कोठारी, ॲड.सुरज अय्यर, ॲड.संदिप केकाणे, विक्रम जैन, केतन कोठारी आदि उपस्थित होते.