केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पारदर्शक पदभरती आणि रेल्वे सुधारणांचे दशक केले अधोरेखित
मुंबई/नागपूर, 26 नोव्हेंबर 2024
गेल्या दशकात पाच लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची पारदर्शक पद्धतीने भरती केली असून या भरतीने 2004 ते 2014 दरम्यानच्या 4.4 लाखांच्या भरतीला मागे टाकले आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ते नागपूरमध्ये अजनी रेल्वे मैदानात आयोजित केलेल्या अखिल भारतीय अनुसूचित जाती/जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच वार्षिक पदभरती कॅलेंडर सादर करण्याला अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष बी. एल. भैरवा, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक नीनू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उद्याच्या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी संविधानाविषयी मोदी सरकारला असलेल्या आदरावर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेत प्रवेश करण्यापूर्वी यासमोर नतमस्तक झाले या कृतीचा दाखला दिला. “संविधानाविषयीचा आदर प्रतीकात्मकतेच्या पलीकडे आहे, तो प्रत्येक कृतीतून प्रतिबिंबित होतो,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी मंत्र्यांनी सध्या सामान्य श्रेणीचे 12,000 डब्यांचे उत्पादन सुरू असल्याची माहिती देत विशेष आणि सामान्य डब्यांच्या उत्पादनासह रेल्वेच्या महत्त्वाच्या सुधारणांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी कर्मचारी संघटनेच्या कार्याची माहिती देणाऱ्या एका स्मरणिकेचे देखील प्रकाशन केले.
त्यांच्या नागपूर भेटी दरम्यान वैष्णव यांनी दीक्षाभूमीवर सेंट्रल मेमोरियल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या दोन दिवसीय अधिवेशनाचा उद्या संविधान दिनी समारोप होणार आहे.