संविधानामुळे जागतिक स्तरावर आपली लोकशाही सशक्त आणि स्थिर – विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, दि. २५ : सन १९५० पासून सुरू झालेल्या भारतीय संसदीय परंपरेने आज ७५ वर्षांची महत्त्वपूर्ण वाटचाल पूर्ण केली आहे. भारतीय संविधानाच्या भक्कम अधिष्ठानामुळे देशाने जागतिक स्तरावर आपली लोकशाही सशक्त आणि स्थिर ठेवली आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सभागृहात केले.
भारतीय गणराज्याच्या ७५व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेत सभापती प्रा. शिंदे यांनी संविधानाची महती आणि त्याचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी संविधानाद्वारे भारताने साधलेल्या ऐतिहासिक प्रगतीचा आढावा घेत राज्यघटनेच्या मूल्यांवर भर दिला.
भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आज भारत जगातील एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय राज्यघटनेने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मुल्यांची महती अधोरेखित करत प्रा. शिंदे म्हणाले, ही मूल्ये आपल्या देशाच्या लोकशाहीचा दीपस्तंभ आहेत. या तत्वांवर आधारित आपली राज्यघटना येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२६ ते १९३७ या काळात मुंबई विधान परिषदेचे सदस्य म्हणून आपले मार्गदर्शक विचार दिले, ज्यांनी आजच्या भारतीय संविधानाचा पाया घातला. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
भारतीय लोकशाहीचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तसेच सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही राज्यघटनेने दिलेली मूल्ये आणि उद्दिष्ट्य आपल्या दृष्टीने चिरंतन प्रेरणाचे स्त्रोत बनलेले आहेत. भारताने संविधानाच्या आधारे ७५ वर्षे लोकशाही टिकवून ठेवत प्रगत राष्ट्र म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे, असेही प्रा. शिंदे यांनी नमूद केले.
संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल संपूर्ण देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जात आहे. आपले संविधान प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि दिशा देईल, यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहायला हवे,” असे आवाहन सभापती प्रा.शिंदे यांनी केले.
विधानपरिषदेत झालेल्या या पहिल्या दिवशीच्या चर्चेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य ॲड.अनिल परब, प्रसाद लाड, भाई जगताप, अमित गोरखे, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, सत्यजीत तांबे, जगन्नाथ अभ्यंकर, सदाभाऊ खोत, अरुण लाड, संजय केनेकर, सुनील शिंदे, योगेश टिळेकर, सचिन अहिर, ज्ञानेश्वर म्हात्रे या सदस्यांनी सहभाग घेतला.