मंत्री गिरीश महाजन बदनामी प्रकरण ; मानहानीची नोटीस प्राप्त झाल्याचा पत्रकार अनिल थत्तेंचा दावा
आ. एकनाथ खडसेंनाही नोटीस येण्याची शक्यता ?

जळगाव, दि-१४/०४/२०२५, पत्रकार अनिल थत्ते यांनी त्यांच्या अनिल गगनभेदी थत्ते या युट्युब चॅनेल वरून काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आय.ए.एस. अधिकाऱ्यांशी संबंध असून महाजन यांनी अनेक वेळा रात्री शंभरपेक्षा जास्त वेळा सदरील महिला अधिकाऱ्यांना कॉल केल्याचा दावा केलेला होता. अनिल थत्ते यांनी केलेल्या याच दाव्याचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी देखील प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन यांचे एका महिला आय.ए.एस. अधिकाऱ्यांशी संबंध असून त्यांचे नाव त्यांना माहित असल्याचा दावा केला होता. त्यानंतर प्रसार माध्यमांनी या विषयाला प्रचंड प्रसिद्धी दिल्यानंतर याविषयी प्रचंड गदारोळ झालेला होता. एकनाथ खडसेंनी केलेल्या त्या कथित दाव्याच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांनी यावर मागील आठवड्यात जळगावमध्ये उत्तर देताना सांगितले होते की, ” एकनाथ खडसेंनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावर लवकरच उचित निर्णय घेऊ ” असे सूचक वक्तव्य केले होते.
दरम्यान , आज या प्रकरणी सर्वात आधी गिरीश महाजन यांच्याबाबतचा तो कथित दावा करणारे पत्रकार अनिल थत्ते यांनीच आज त्यांच्या यूट्यूब चैनल वरून दावा केलेला आहे की, त्यांना आज मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मानहानीची नोटीस प्राप्त झालेली आहे. मात्र अनिल थत्ते यांनी या नोटीस मध्ये नेमके काय नमूद करण्यात आलेले आहे ? याबाबतचा खुलासा केलेला नाही. ते आज किंवा उद्या मध्ये याबाबतचा खुलासा करणार आहेत. तर दुसरीकडे याच प्रकरणी एकनाथ खडसे यांनी सुद्धा केलेल्या कथित दाव्यामुळे त्यांना सुद्धा नोटीस बजावण्यात येते की काय ? अशी शंका आता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पुढील एक दोन दिवसात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून याबाबतचा अधिकृत खुलासा करण्यात येणार आहे. आधीच जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असतानाच, आता या घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण सुद्धा पुन्हा एकदा तापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.