कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने तरूणाची निर्घृण हत्या, महामार्गावर मध्यरात्रीचा थरार

जळगाव दि-04/05/2025, जळगाव शहरातील भुसावल रोडवरील हॉटेल कमल पॅराडाइजजवळ शहरातील एका ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. आकाश पंडीत भावसार रा.अयोध्या नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मदत घोषित केलेले आहे. जिल्हा रुग्णालयात मयताचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने आज सकाळपासून मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील अयोध्या नगरजवळ राहणारा आकाश पंडीत भावसार हा तरुण ट्रान्सपोर्ट एजंटचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी व सासरच्या मंडळी सोबत कौटुंबिक वाद सुरू होते. त्यानंतर तो पत्नीसह वेगळा राहायला सुद्धा गेला होता. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नीचे नातेवाईक असलेल्या काही तरुणांनी हॉटेल ए वन जवळ त्याला गाठले, आणि धारदार शस्त्राने तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्याने तो रक्तबंबाळ झाला. आकाश यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. मयतच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. याप्रकरणी ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून, त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झालेली आहेत.