RPI चे राजू सुर्यवंशींचा जामीन मंजूर ? भुसावळ विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता ?
भुसावळ ,दि- २७/१०/२४ , भुसावळ शहरात गेल्या २८ मे रोजी जळगाव नाक्यावर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांची त्यांच्या चारचाकीतच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनाही धुळे जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती.ते हल्ली नंदुरबार कारागृहात असताना काही अटी व शर्तींच्या बंधपत्रावर त्यांना विधानसभा निवडणुक लढण्यासाठी जामीन मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून या हायप्रोफाइल हत्याकांडाच्या खटल्याची विविध न्यायालयांमध्ये गोपनीय पद्धतीने सुनावणी झाली होती. राजू सुर्यवंशी यांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी म्हणून अटक झाल्यापासून ते नंदुरबार कारागृहात होते.मात्र काल जळगाव सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
अलिकडेच जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असून त्यात भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा अनेक इच्छुक गेल्या काही दिवसांपासून तयारी करत होते .यात प्रामुख्याने RPI चे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र ते कारागृहात गेल्यावर त्यांच्या नावाची चर्चा थांबली होती. कारण ज्या खुनाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती ,ते अत्यंत संवेदनशील व हायप्रोफाइल प्रकरण आहे. मात्र विधानसभा निवडणुक लढण्यासाठी राजू सुर्यवंशी यांनी जामिनासाठी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात काही दिवसांपासून अर्ज केला होता. त्यांना काल न्यायालयाने काही अटी व शर्ती लागू करून जामीन मंजूर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ते त्यांच्या प्रतिनिधींनींच्या माध्यमातून उद्या किंवा परवा भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून विद्यमान आमदार संजय सावकारे, वंचित बहुजन आघाडीकडून जगन सोनवणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून डॉ राजेश मानवतकर यांची उमेदवारी घोषित होऊन तिरंगी लढत होणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. त्यात आता राजू सुर्यवंशी यांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मात्र RPI आठवले गट हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने ते नेमकी काय भूमिका घेतात हे पुढील दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
भुसावळचे राजकारण तापणार ?
सध्याच्या उमेदवारी वरून भुसावळच्या महाविकास आघाडीतील राजकारणात मोठ्या उलथापालथी झालेल्या असून सध्याच्या राजकीय घडामोडी बघता आता राजू सुर्यवंशी यांच्या अचानक ऐनवेळी एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. त्यामुळे राजू सुर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भुसावळच्या राजकारणात मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. राजू सुर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भुसावळचं राजकीय वातावरण मात्र नक्कीच तापणार असल्याचे बोलले जात आहे.
डॉ राजेश मानवतकरांचा ‘माईंड गेम’ यशस्वी ? तर काँग्रेस नेत्यांनी पडद्यामागून भुसावळात एका दगडात मारले अनेक पक्षी ?
गेल्या काही दिवसांपासून भुसावळची जागा ही ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटणार की ? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुटणार ? याबाबत अनेक दिवसांपासून काथ्याकूट व जोरदार चर्चा सुरू होती. मात्र काल काँग्रेसकडून यादी जाहीर झाल्यानंतर पहिलेच नाव डॉ राजेश मानकर यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे भुसावळची जागा ही नेमकी कोणत्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून काँग्रेसकडे गेली याबाबत कोणतीही स्पष्टता समोर आलेले नाही. डॉक्टर राजेश मानकर यांनी मात्र यापूर्वी पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मुलाखत देऊन आलेले होते. यावेळी त्यांच्यासोबत भुसावळातील इतर काही निवोदित इच्छुक उमेदवारही मुलाखतीठी हजर होते. कारण भुसावळ विधानसभा मतदारसंघाची ही जागा परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात होती. त्या दृष्टीने डॉ मानवतकर यांनी नियोजन सुद्धा केलेले होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसताना आणि मुलाखत दिल्याचे समोर आलेलं नसताना त्यांना थेट काँग्रेसचे अनपेक्षितपणे तिकीट जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. डॉ मानवतकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने अनेकांचा ‘राजकीय गेम‘ झाल्याची चर्चा भुसावळात सुरू झालेली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी भुसावळच्या राजकारणात पडद्यामागून दगड मारून एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. कारण काही नवखे इच्छुक उमेदवार हे दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हायकमांड कडे भेट घेण्याआधीच डॉ मानवतकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी येऊन धडकल्याने दिल्लीत उपस्थित काही इच्छुक उमेदवारांचा मोठा हिरमोड झालेला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे.
माजी आमदार संतोष चौधरी यांची भूमिका काय ?
भुसावळ तालुक्यातील कोणतीही निवडणूक म्हटली म्हणजे ती माजी आमदार संतोष चौधरीं शिवाय अपूर्णच असते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संतोष चौधरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केलेले होती. त्यांना शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी हिरवा कंदील देखील दिलेला होता. यानंतर भुसावळ शहरात चौधरी समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुद्धा केलेला होता. मात्र ऐनवेळी माशी शिंकली आणि संतोष चौधरी यांचा एका वरिष्ठ राजकीय नेत्याने संत मुक्ताबाईंच्या आशिर्वादाने ‘राजकीय गेम’ करून नवख्या श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तेव्हापासूनच माजी आमदार संतोष चौधरी हे पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली होती. त्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत भेट घेऊन काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिलेले होते. मात्र त्यांचा अधिकृत काँग्रेस प्रवेश होण्याआधीच काँग्रेसच्या हाय कमांडने भुसावळ विधानसभेमध्ये माजी आमदार संतोष चौधरींना विश्वासात न घेता परस्पर डॉ राजेश मानवतकर यांना उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे संतोष चौधरी आता डॉ राजेश मानवतकर यांना पाठिंबा देतात की नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे भुसावळ तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. याबाबत संतोष चौधरी हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात आहे. कारण दुसरीकडे त्यांचे धाकटे बंधू अनिल चौधरी हे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून यावेळी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी अनिल चौधरी यांना बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. गेल्यावेळी संतोष चौधरी यांनी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात अनिल चौधरी यांचा जोरदार प्रचार केलेला होता. आणि त्याचे फलित म्हणून अनिल चौधरी यांनी अपक्ष लढूनही तब्बल 44000 मते घेतलेली होती.