तर निवडणुका नक्कीच बॅलेट पेपरवर घेऊ-मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांचे मोठं विधान
फेक न्युज वर आयोगाची नजर
मुंबई, दि.23 :भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 22 मार्च 2024 या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजि पत्रकार परिषदेत श्री एस. चोक्कलिंगम् बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19.04.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20.03.2024 पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 27.03.2024 असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी दि.28.03.2024 रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दि.30.03.2024 असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.
तर निवडणुका नक्कीच बॅलेट पेपरवर घेऊ
मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये 300 पेक्षा जास्त उमेदवार उभे करण्याची तयारी चालवलेली आहे. असे झाल्यास त्या ठिकाणी निवडणुका बॅलेट पेपरवर घेणार का ? असा प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, तसे झाल्यास निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यास आम्ही तयार आहोत आणि तशी तयारी केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणुका व्यवस्थितरित्या पार पाडणार आहोत अशी ग्वाही एस. चोक्कलिंगम् यांनी दिलेली आहे. 13,141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई लोकसभा सार्वत्रिक निवडणूका, 2024 निप:क्षपाती व शांततापुर्वक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. निवडणूकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. त्यांतर्गत दि.22 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 308 परवाना नसलेली शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यामध्ये एकूण 77 हजार 148 शस्र परवाने दिलेले आहेत. त्यापैकी 45 हजार 755 शस्त्रांच्या अनुषंगाने ताब्यात घेणे, जप्त करणे किंवा मुभा देणे इ. कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरीत कार्यवाही सुरु आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी प्रमाणे 13 हजार 141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
माध्यम देखरेख नियंत्रण कक्ष राज्यात प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया, सोशल मिडीयावर निवडणुकांशी संबंधित प्रसारित होणाऱ्या खोट्या, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अशा बातम्यांना जलद प्रतिसाद देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय स्तरावर माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षामार्फत फेक न्युजबाबत प्राप्त माहितीबाबतचा दैनंदिन अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अधिनस्त माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.