नाशिकमध्ये महायुती हेमंत गोडसेंचा ‘भुजबळ’ करणार ?, एखाद्याचा ‘भुजबळ’ करण्याची अलीकडच्या काळातील पहिलीच घटना ठरणार ?
नाशिकच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता
नाशिक दि-१ एप्रिल, एखाद्याचा ‘भुजबळ’ करू ही म्हणं काही वर्षांपूर्वी खूप गाजली होती. आता या म्हणीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झालेले असून त्याला निमित्त आहे ते नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची चांगलीच धाकधूक वाढली आहे. आज सकाळीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू ,असं बोललेलं असताना छगन भुजबळांच्याच नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं टेन्शन मात्र वाढलं आहे.
एक प्रकारे आता हेमंत गोडसे यांच्या सिटिंग खासदारकीच्या जागेचा ‘भुजबळ’ होतो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात महाराष्ट्रात एखाद्याचा ‘भुजबळ’ होण्याची पहिलीच घटना असेल.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. तिसऱ्यांदा ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यात सांगितले होते की, नाशिक जिल्ह्यात आमची ताकद शिंदे गटापेक्षा जास्त असून शहरात तीन आमदार असताना नाशिक लोकसभेची जागा आम्हाला म्हणजेच भाजपला द्यावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. मात्र मागील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वात मातब्बर नेते अशी ओळख असणारे छगन भुजबळ यांचे नाव सध्या नाशिक लोकसभेसाठी विशेष चर्चेत आहे. भुजबळांनी दिल्लीत फील्डिंग लावली असून दिल्लीतूनच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्याच आठवड्यात खासदार हेमंत गोडसे, मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी हे नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटालाच म्हणजेच हेमंत गोडसे यांनाच मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलेले होते. मात्र त्या आंदोलनाचा परिपाक आता दिसून आलेला नाही.ही जागा आता शिंदे गटाच्या हातून निसटते की काय ? असं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे नाशकात आता प्रचंड घडामोडींनी वेग घेतलेला असून ही जागा शिंदे गटाला न सुटल्यास हेमंत गोडसे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे नाशिकच्या जाहीर होणाऱ्या उमेदवारीवर संपूर्ण उत्तरा महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.