पत्रकारास शूटिंग करण्यास मनाई करून कॅमेरा हिसकावल्या प्रकरणी जळगाव महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल
जळगाव महापालिका प्रशासनात प्रचंड खळबळ
जळगाव दि-११/१२/२०२४ गेल्या काही दिवसांपासून चोरी, भामटेगिरी, आणि लाचखोरी प्रकरणात बदनाम झालेल्या जळगाव महानगरपालिकेतून आणखी एक झटकादायक बातमी समोर आलेली असून सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील रहिवासी असलेले पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव शहर महानगरपालिकेतील लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे तेथे आले आणि त्यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने अधिकार नसताना हिसकावून घेऊन एका कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिला आणि त्यातील मेमरी कार्ड देखील काढून घेतले होते. त्यानंतर पत्रकार विक्रम कापडणे यांनी लागलीच महानगरपालिकेतून निघून थेट
जळगाव शहर पोलीस ठाण्यात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात पदाचा गैरवापर करून पत्रकाराच्या कामात अडथळा आणल्या प्रकरणी भारतिय न्याय संहिता कलम ११५ (२) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विक्रम कापडणे यांनी तक्रारीत नमूद केलेले आहे की, उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला. यावेळी घटना घडताना साक्षीदार म्हणून भांडारपाल आणि मनपातील काही कर्मचारी तेथे उपस्थित होते.
कायदेशीर दृष्टिकोन: उच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार, शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता टिकवण्यासाठी व जनहिताच्या मुद्द्यांसाठी शूटिंग करण्यास मनाई नाही. अशा परिस्थितीत, शासकीय अधिकारी जर त्यांच्या पदाचा गैरवापर करत पत्रकारांना काम करण्यापासून रोखत असतील तर तो कायद्याचा भंग मानला जातो.
या प्रकरणावर पोलीस तपास सुरू असून सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांची भूमिका व त्यांचा प्रतिवाद काय आहे, यावर तपशील येणे अपेक्षित आहे. तसेच, पत्रकार संघटनांकडूनही या घटनेचा निषेध केला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी पत्रकारितेचे महत्त्व असून, अशा घटना पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अनेक पत्रकारांनी केला आहे.
सदरील घटना ही सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय कार्यालयात शूटिंग करण्यास मनाई आहे असं काही आपल्याकडे निर्णय आहे का ? असा प्रश्न विचारल्यानंतर संबंधित अधिकारी हे निरुत्तरित झाले ? यावरून कळते की अधिकाऱ्यांना कायद्याचे ज्ञान नेमके किती ? त्यानंतर सर्वांच्या साक्षीने गणेश चाटे यांनी संबंधित पत्रकारांचा कॅमेरा हा परत केला या सर्व घटनेत पत्रकारांचा कॅमेरा याचे काही नुकसान झाले आहे का ? किंवा त्याच्यातील काही महत्त्वाचे व्हिडिओ आहे डिलीट झाले आहेत का ? हे सविस्तर कॅमेरा ऑपरेट केल्यानंतरच कळणार आहे.