प्रशासनात नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञान स्नेही उपक्रम राबवून अभियान यशस्वी करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव,दि.२३ सप्टेंबर प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्याकरिता, तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविले जात आहे. प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञान स्नेही उपक्रम राबवून अभियान यशस्वी करावे. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, जळगाव वन उपसंरक्षक प्रविण ए, मनपा आयुक्त डॉ.विद्मा गायकवाड, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आदी उपस्थित होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, प्रशासनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत सर्वसामान्यांना पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरविण्यात याव्यात. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२३-२४ जिल्हा प्रशासनातील प्रत्येक घटकांने सांघिक प्रयत्नातून यशस्वी करावे. अभियानात भाग घेण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना पुढाकार घेत आपल्या अधिनस्त असलेल्या होतकरू, तंत्रज्ञान स्नेही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा जिल्ह्यात २० ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत ३१ ऑक्टोबरच्या आत pragatiabhiyan.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करून सर्व शासकीय विभागांनी अभियानात सहभाग नोंदवावा. जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील स्पर्धेचे अर्ज विहीत कालावधीत ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यात यावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.