बदलापूर चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरण, 3 पोलिस निलंबित, ऍड.उज्वल निकमांची नियुक्ती, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी
मुंबई दि-20/08/2024,पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करुन अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची दाहकता अद्याप शमलेली नाही. तोच आता बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चिड आणणारी घटना घडली आहे. सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. तसेच, शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन केले आहे. एका पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, शाळेतील दादाने कपडे काढून प्रायव्हेट पार्टला हात लावला. या प्रकरणी संशयित आरोपी असलेला सफाई कामगार असलेला आरोपी अक्षय शिंदे याच्यावर पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमे लावत गुन्हा दाखल केला आहे. शाळा प्रशासन आणि पोलिसांना या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी एकत्र येत बदलापूर बंद ठेवण्याची घोषणा केली. पीडित कुटूंबाची तब्बल 12 तास तक्रार नोंदवली गेली नव्हती. मंगळवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सर्वांना रेल्वे स्टेशनच्या पटरीवर ठिय्या आंदोलन केलं. शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकच मागणी लावून धरली आहे. आज सकाळपासूनच सात ते आठ तासांपासून बदलपूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी रेल रोको केलं होतं. यामुळे मुंबईची लाईफ लाईन आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प झाल्या आहेत, तर काहींचा रेल्वे मार्ग बदलला आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन करून देखील आंदोलक काही मागे घटण्यास तयार नाही. अशातच सरकारचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर स्थानकात आक्रमक आंदोलकांची भेट घेतली. गिरीश महाजन येताच आंदोलकांनी ‘फाशी…फाशी…’ अशा घोषणाबाजी सुरु केली. यावेळी गिरीश महाजन यांनी नागरिकांना असा रेल रोको करून प्रश्न सुटणार आहे का ? असे म्हणत शांतता राखण्याचे आवाहन केले. तर तुम्हाला हवं तेच होईल, तुमचं म्हणणं जे आहे तेच सरकारचं आहे. आरोपीवर कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई होईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिलं आहे.
दरम्यान,ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका नामांकित शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठित करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. ऊज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, पोलिस आयुक्तालयाच्या कक्षे अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. पोलिस संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि, कुठे काही विलंब असेल, तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा गंभीर घटनांमध्ये न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश सुद्धा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.ऊज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.