क्राईम/कोर्टमुंबई
Trending

मुंबईत धावत्या एक्सप्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबाराने खळबळ,एका पोलिस अधिकाऱ्यासह चार ठार

मुंबई दि:31 जुलै : आज पहाटे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या
जयपुर-मुंबई  एक्सप्रेस मध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची थरारक घटना घटना घडलेली आहे. या घटनेने मुंबईसह रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे.
या गोळीबारात एका रेल्वे पोलिस अधिकाऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी ही थरारक घटना घडली. प्रवासी झोपेत असताना धावत्या एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याने प्रवाशी चांगलेच हादरून गेले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा प्रकार घडलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. या थरारक घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे विरार ते चर्चगेट स्थानकादरम्यानचे लोकलचे वेळापत्रक कोलमडले  असून लोकल वाहतूक सेवा ही 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.
आज पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी जयपूर एक्सप्रेस ट्रेन (12956)च्या बी-5 बोगीत ही धक्कादायक घटना घडली. ही एक्स्प्रेस जयपूरहून मुंबईला येत होती. विशेष म्हणजे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतनकुमार याने हा गोळीबार केला. बोगी नंबर बी-5मध्ये त्याने अंदाधुंद गोळीबार केला. चेतनकुमार हा एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर तो दहिसरच्या दिशेने पळून जात होता. मात्र, मीरा रोड लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबार कधी झाला?
ही एक्सप्रेस पालघर स्थानकाच्या काही अंतरावर असतानाच ही घटना घढली. सकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी हा गोळीबार झाला. वापी ते मीरा रोड स्टेनशच्या दरम्यान आरपीएफ जवानाने अचानक चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.या घटनेत एकूण चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यात आरपीएफ अधिकारी टीकाराम आणि इतर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टीकाराम हे एस्कॉर्टचे प्रभारी होते.
गोळीबार करणारा कोण ?
चेतनकुमार सिंह असं गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. तो आरपीएफचा कॉन्स्टेबल होता. चेतन एस्कॉर्ट ड्यूटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने धावत्या ट्रेनमध्ये बाहेर उडी मारली. त्याला मीरा रोड आणि बोरिवलीच्या दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळील शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.
गोळीबार का झाला?
रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल चेतनकुमार आणि त्याचे सहकारी असलेले ASI टीका राम यांच्यात वाद झाल्याने हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, नेमकं कारण समोर आलं नाही. आरपीएफ या घटनेची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी चेतनची सुरतहून मुंबईला बदली झाली होती, अशी माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिलेली आहे.
रेल्वेने काय सांगितलं?
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार केला. त्यात दुसऱ्या आरपीएफ अधिकाऱ्यासहीत आणखी तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो दहिसरमध्ये धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळाला. मात्र,लोहमार्ग पोलिसांनी त्याला पकडून अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button