रावेर लोकसभेसाठी चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्या ‘या’ मुलीचे नाव आता चर्चेत, इच्छुकांची धाकधूक वाढली
एकनाथराव खडसे 'कारसेवक' म्हणून लढणार ?
मुंबई दि-१२ मार्च, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असून कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळते याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट यावेळी कापले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या जागी रोज नवनवीन नावांची चर्चा समोर येत आहे. आधी यात सर्वात आघाडीवर भाजपचे पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, डॉ केतकी उल्हास पाटील, जनार्दन हरी महाराज यांची नावे चर्चेत आहेत. यातच आता आणखी एका नवीन वजनदार नावाची भर पडलेली असून त्यामुळे विद्यमान इच्छुक उमेदवारांची संख्या वाढताना दिसत आहे.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नवसारीचे खासदार सी आर पाटील यांची जेष्ठ कन्या भावीनी राम पाटील त्यांचे नाव आज चर्चेत आलेले असून त्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्या आहे. त्यांच्या उमेदवारी संदर्भात थेट गुजरात मधूनच फिल्डींग लावली जात आहे. त्यांचे वडील चंद्रकांत रघुनाथ पाटील हे 2020 मध्ये गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चेत आहेत. त्यांचा जन्म 16 मार्च 1955 रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झालेला असून त्यांचा जळगाव जिल्ह्यातील खास करून रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी घनिष्ट संबंध आहेत. चंद्रकांत पाटील यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता त्या दृष्टीने भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी चाचपणी सुरू केलेली असून आता यावर काय निर्णय होतो ते संध्याकाळपर्यंत कळणार आहे.
चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचा मोठा मुलगा जिग्नेश हा सध्या गुजरातमधील नवसारी मध्ये राजकारणात सक्रिय असून , एक मुलगी धरती देवरे ही धुळे जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे. त्यांचे सुद्धा नाव धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीवर असून दोघी बहिणी पैकी एका बहिणीला भाजपकडून लोकसभा उमेदवारीसाठी तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच तिसरी मुलगी ही धर्मिष्ठा असून ती सुरतला राजकारणात सक्रिय सहभागी आहे.
एकनाथराव खडसे ‘कारसेवक’ म्हणून लढणार ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे रावेर लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असलेले एकनाथराव खडसे हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असून त्यांना भाजपकडून तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्यंतरी त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी तब्येतीवर पुढील सर्वकाही निवडणुकीचं गणित अवलंबून असल्याचे सांगितले असले, तरी ते तब्येत ठीक झाल्यास ‘कारसेवक’ म्हणूनच मैदानात उतरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.