लोकसभेसाठी रावेर मधून जनार्दन हरी महाराज,तर जळगाव मधून उज्ज्वल निकम यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी
मुंबई दि-23 पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून आता त्याचे पडघम वाजण्यास सुरवात झालेली आहे. एनडीए आणि I.N.D.I.A या दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांच्या बैठका सुरु आहेत. देशातील अनेक ठिकाणी लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आघाडी घेतली असून येत्या लोकसभा निवडणुकीत काही धक्कादायक नावांची चाचपणी भाजपकडून केली जात आहे.
आज देशाचे गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंदद्वार एक बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.यामध्ये रावेर मधून महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज ,जळगावमधून उज्ज्वल निकम, धुळ्यातून माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर मुंबईतल्या पश्चिम उपनगरातील एका मतदारसंघासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित तर पुणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून २०१९ साली विजयी झालेल्यांपैकी काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता २०२४ साली जळगाव व रावेर मतदारसंघात भाजप मोठा बदल करत असून धक्कादायक नाव म्हणजेच ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम आणि महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्या नावाची चाचपणी भाजपकडून केली जात आहे. त्यामुळे अमित शहा यांनी मुंबईत येऊन काही धक्कादायक नावांची चर्चा आणि चाचपणी केल्याने येत्या काही दिवसांत राज्यातील राजकारण जोरदार तापण्याची शक्यता आहे.