‘ साईजीवन ‘ सुपरशॉपींमध्ये अग्नीसुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नसल्याने ग्राहकांच्या जीवाला धोका ! तात्काळ ‘सील’ करण्याची तक्रार दाखल
भुसावळ दि-30/10/2024, शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती आर्केडच्या थोडेसे पुढे दक्षिणबाजूस आणि यावल रोडवरील साईजीवन सुपरशॉपी नावाचे मोठे घरगुती वस्तूंचे दुमजली आणि तीन मजली वेगवेगळे स्वतंत्र दालन आहे.या दोन्ही साईजीवन सुपरशॉपींच्या इमारतीच्या बांधकामामध्ये सर्वाधिक फायबर सदृश्य पारदर्शक काचेचा वापर करण्यात आलेला असून ही काच ज्वलनशील पदार्थ आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालनालय यांचे निर्देशानुसार महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम 2006 घ्या कायद्यान्वये सर्व प्रकारचे छोटे-मोठे मॉल्स व सुपरशॉपींच्या इमारतीमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना सक्तीच्या करण्यात आलेल्या असून वेळोवेळी अशी उपाययोजना प्रभावीपणे सक्षम आहे की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी अर्थात प्रत्येक जानेवारी आणि जुलै महिन्यात अशी वर्षांतून दोन वेळा अग्नीसुरक्षा व्यवस्था प्रणालीचे परीक्षण ( Fire sefty audit) करून घेणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.अग्नीसुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण करण्याकरिता महाराष्ट्र शासन संचालक अग्नीशमन सेवा यांनी सुनिश्चित केलेल्या अनुज्ञाप्तीधारक अभिकरणांकडून ( अभिकर्ता परवाना धारक) करून घेणे आवश्यक आहे.सोबतच परिक्षण केल्याचे विहित नमुन्यातील ‘प्रमाणपत्र’ संबंधित नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागात व विभागीय सहसंचालक अग्नीशमन सेवा, मालेगाव, जि.नाशिक यांचेकडेस सादर करणे बंधनकारक आहे. मात्र भुसावळ शहरातील साईजीवन सुपरशॉपींच्या दोन्ही दालनांसह अन्य मोठ्या व मॉल सदृश्य दालनांमध्ये कोणत्याही प्रकारची वरील नमूद कायद्यान्वये अग्नीरोधक यंत्रणा बसविलेली नसल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार उघड झालेले आहे. सध्या दिवाळीच्या सणानिमित्त खरेदीसाठी हजारो नागरिकांची तथा ग्राहकांची या दोन्ही ठिकाणच्या साईजीवन सुपरशॉपींच्या इमारतींमध्ये प्रचंड गर्दी दिसून आलेली आहे.या तीन मजली भव्य दालनांमध्ये तेल , कपडे, व इतर प्लास्टिकच्या पॅकिंग केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास मोठी जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम 2006 च्या सक्तीच्या नियमावलीची कुठेही अंमलबजावणी झालेली नसून सध्याची प्रचंड गर्दी बघता या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याआधीच या दोन्ही साईजीवन सुपरशॉपींना तात्काळ ‘सील ‘ करण्याची कारवाई करण्यात यावी. तसेच त्यानंतर भुसावळ शहरातील अशा छोट्या-मोठ्या मॉल्स व सुपर शॉपींची ही तपासणी करून त्यांच्यावरही अशीच दुकाने ‘सील’ करण्याची कारवाई करण्यात यावी. तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत साईजीवन सुपरशॉपींचे दोन्ही दालन सुरू करण्यात येऊ नये ,अशा आशयाची प्रशासकांतर्फे आजच तात्काळ नोटीस बजावण्यात यावी , अशी मागणी भुसावळ नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांचेकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आलेली आहे.तसेच याची प्रत माहितीस्तव सहसंचालक अग्नीशमन सेवा, नाशिक आणि जिल्हाधिकारी, जळगाव , व मुख्याधिकारी नगरपरिषद ,भुसावळ यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे.