सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत घोटाळा, टीसीएसच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
MPSC मार्फत परीक्षा घेण्याची परीक्षार्थींची मागणी
मुंबई दि-१५, #PWDexamscam, #TCSExamscam , महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या कनिष्ठ अभियंता पदासाठीच्या सीबीटी परीक्षेत देशातील सर्वात मोठ्या नामांकित अशा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या परीक्षा घेणाऱ्या नामांकित कंपनीच्याच कर्मचाऱ्यांनी परीक्षार्थींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी उत्तरांची झेरॉक्स कॉपी पुरवण्यासह परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या परीक्षा प्रश्नांसंदर्भात अगोदरच माहिती पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना ए-4 पेपरवर उत्तरे दिल्याचा आरोप करून लातूरमधील उपविभागीय अभियंत्याने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसच्या (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांवर परीक्षेत कॉपी पुरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामुळे अत्यंत विश्वासार्ह परीक्षा प्रणाली असा नावलौकिक असलेल्या TCS कंपनीच्या परीक्षेसंदर्भातील कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. तसेच TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या इतरही शासकीय पदभरतीच्या परीक्षांवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
सदरील घटना लातूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या भरती परिक्षेच्या वेळी एका परीक्षा केंद्रावर घडली होती. या संदर्भात त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या समन्वय समिती मार्फत पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने लातूर पोलिसांनी परीक्षा केंद्रातील कक्षाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता दोन कर्मचारी हे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे.त्यामुळे ‘त्या’ संबंधित दोन कर्मचाऱ्यांवर कॉपी पुरविल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून पोलिसांनी पुढील चौकशी सुरू ठेवलेली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्डस् ,सीडीआर, व लोकेशनची माहिती घेतली जात असून त्यांनी काही विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या संदर्भात काही पैसे घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच यात आणखीही काही टीसीएस कंपनीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे का ? याची व्याप्ती किती ? याबाबतही खातरजमा तथा चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत पोलिसांनी गुप्तपणे व तांत्रिकदृष्ट्या चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलेली आहे.
लातूर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या परीक्षेत कॉपी पुरविण्याच्या प्रकरणासंदर्भात मुंबतील TCS कंपनीच्या परीक्षेच्या संदर्भातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, याबाबत अंतर्गत चौकशी सुरू असून या संदर्भात अधिक बोलणे टाळलेले आहे.
परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीचे कर्मचारीच असे गैरप्रकारांना पाठबळ देत असल्याने दिवसरात्र अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे परिक्षा घेणाऱ्या नामांकित खाजगी कंपन्यावरील विश्वासार्हता कमी होत आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा समन्वय समितीने संपूर्ण परीक्षा ‘एमपीएससी’ घ्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केलेली आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या संदर्भात काय स्पष्टीकरण देतो याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागून आहे.
Sources by lokmattimes