सीबीआयची धाड, नाशिक प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) आयुक्तांसह दोघांना केली अटक, सभासदांमध्ये खळबळ
नाशिक दि-29 डिसेंबर, सीबीआय (CBI) अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी तसेच आणखी एका व्यक्तीला दोन लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात अटक केल्याने भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) व त्याच्याशी संबंधित लाखो सभासदांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली केली आहे.अशा प्रकारे या अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयात लाच प्रकरणी थेट केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ने धडक कारवाई केल्यामुळे या विभागांतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नाशिकचे रहिवासी असणाऱ्या ईपीएफओ अधिकारी तसेच आणखी एक व्यक्ती अशा दोघांविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या तक्रारीवर कारवाई करत तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारदाराच्या कंपनीशी संबंधित भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संबंधी एका प्रकरणी समेट घडवण्यासाठी तक्रारदाराचा अवाजवी फायदा घेत सदर ईपीएफओ अधिकाऱ्याने खासगी पीएफ सल्लागारासह संगनमताने 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन ही रक्कम स्वीकारली. तक्रारदाराने ही रक्कम उपरोल्लेखित खासगी पीएफ सल्लागाराकडे द्यावी अशी सूचना सदर ईपीएफओ अधिकाऱ्याने दिली.
सीबीआयच्या अधिका-यांनी सापळा रचून ईपीएफओचे दोन अधिकारी आणि एक व्यक्ती अशा तिघांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
नाशिकमध्ये सात ठिकाणी घातलेल्या छाप्यांमधून रोख रक्कम, अयोग्य पद्धतीने फायदा घेतल्याचे तपशील लिहिलेल्या डायऱ्या इत्यादी, गुन्हा करताना वापरलेले साहित्य ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या आरोपींना आज नाशिकच्या सक्षम न्यायालयात हजार करण्यात आले. या आरोपींना न्यायालयाने 1 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.