झिका व्हायरसमुळे दोघांचा मृत्यू झाल्याने पुण्यात मोठी खळबळ, आतापर्यंत 37 जणांना विषाणूची लागण
Zika virus in Pune पुणे, दि-२७ जुलै, एकीकडे पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून हाहाकार माजलेला असताना पुण्यातून आणखी एक मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली आहे. या जुलै महिन्याच्या सुरुवातीला मृत्यू झालेल्या ७६ आणि ७२ वर्षीय दोन रुग्ण झिका संक्रमित होते, असे वैद्यकीय अहवालातून आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्या नमुन्यांमध्ये झिका संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या कार्यवाहक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळवंत यांनी २२ जुलै रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या संचालकांना पत्र लिहून या प्रकरणांबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. ‘हिंदुस्तान टाईम्स’ ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
वारजे येथील मृत रुग्णाला १० जुलै रोजी जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि १४ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला होता. त्याचे नमुने १८ जुलै रोजी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी प्राप्त झालेल्या अहवालात झिका विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. पीएमसीच्या एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मृत्यूचे कारण हायपरटेन्शनसह इस्केमिक यकृताच्या दुखापतीसह न्यूमोनिटिससह तीव्र कोरोनरी सिंड्रोम असल्याचे सांगितले जात आहे.खराडी येथील दुसऱ्या रुग्णाला १८ जुलै रोजी शास्त्रीनगर येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने २२ जुलै रोजी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते आणि २३ जुलै रोजी अहवालात झिका विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या मृत्यूचे कारण सेप्टिसेमिक शॉक, मल्टीऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम विथ हिमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस (एचएलएच) असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, प्रभात रोड येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय महिलेला शुक्रवारी झिका विषाणूची लागण झाल्याने शहरातील एकूण रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. या महिलेला १५ जुलैपासून ताप आणि सूज अशी लक्षणे दिसू लागली. तिचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आणि चाचणी अहवालात विषाणूसंसर्गाची पुष्टी झाली आहे. डॉ. बळवंत ‘हिंदुस्तान टाइम्स’ शी बोलताना म्हणाले की, ‘या भागात पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मनपाने संशयित गर्भवती महिला एनआयव्हीचे ३८ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. यामध्ये घोले रोड येथील १२, खराडी येथील ९ आणि पाषाण आणि कोथरूड येथील प्रत्येकी ७ नमुन्यांचा समावेश आहे, अशी माहिती पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. पुण्यात झिका रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. प्रशासनाकडून संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तत्काळ चाचणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.