केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडखानी, कोथडीच्या यात्रेदरम्यान घडला प्रकार
मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याने जिल्ह्यात खळबळ

जळगाव दि-०२/०३/२०२४: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची तिच्या मैत्रिणीसह यात्रेमध्ये काही टवाळखोर पोरांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. रक्षा खडसे यांची मुलगी आणि त्यांच्या मैत्रिणी यात्रेत गेल्या होती. त्यावेळी त्यांची छेड काढण्यात आली. इतकंच नाही तर त्यांच्या सोबत असणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही संबंधित टवाळखोरांनी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आलेली आहे. या सगळ्या प्रकारावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.या मुलींची छेडछाड काढणाऱ्यांचा आका राजकीय नेता असून या गुंडांविरोधात यापूर्वी देखील विविध गुन्हे दाखल असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रेमध्ये काही टवाळखोर तरुणांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अल्पवयीन मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. टवाळखोर मुलांविरोधात सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर, रक्षा खडसे यांनीदेखील आरोपींवर कारवाई करावी यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी या गुंडाना राजकीय अभय असल्याचा आरोप केला.
एकनाथ खडसे यांनी काय म्हटले?
एकनाथ खडसे यांनी न्यूज 18 सोबत बोलताना सांगितले की, महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या व छेडखानीच्या घटना वाढत आहेत. पण घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी आपला धाक वाढवायला हवा. मंत्र्यांच्या घरच्या सदस्यांबाबत असे प्रकार होत असतील तर सामान्यांचे काय असा सवालही त्यांनी केला. घटना घडली तेव्हा पोलीस उपस्थित होते. पोलिसांना शिविगाळ, धक्काबुक्की करण्यात आली. इतकी हिंमत गुंडाची झाली आहे. असा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.