संतोषभाऊंच्या ‘एन्ट्रीने’ रावेरची समीकरणं बदलली, ईश्वरलाल जैन यांच्या ‘त्या’ आठवणी झाल्या ताज्या ! भाजप उमेदवार बदलणार ?
शरद पवारांनी 'गुगली' ऐवजी टाकला 'दूसरा' !
जळगाव दि-१८, एकेकाळी भुसावळच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी गेल्या काही वर्षांपासून कायदेशीर अडचणीमुळे राजकारणापासून दूर फेकले गेलेले होते. त्यांना एका कथित खंडणीच्या गुन्ह्यात काही वर्षे शिक्षा झाल्यानंतर त्यांना काही ठराविक कालावधीपर्यंत निवडणूक लढवता आलेली नव्हती. त्यातच भुसावळ विधानसभेची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने ते अन्य उमेदवारांना ते भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात पाठिंबा देऊन निवडणुकीत रंगत भरत होते. मात्र गेल्या एका दशकानंतर संतोषभाऊ आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या ताकदीने उभे राहणार असल्याचे समजते. तशी जोरदार तयारी त्यांनी केल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जातंय. रावेर लोकसभेसाठी आधीच भाजपकडून रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झालेली आहे.
संतोष चौधरींना लोकसभेची उमेदवारी जाहीर
संतोषभाऊ चौधरींचे नाव रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे जाहीर झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव सचिन चौधरी यांनी माध्यमांना दिलेली आहे.
आज संतोषभाऊ चौधरी यांना रावेर लोकसभेची शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुसावळात त्यांचे बंधू अनिलभाऊ चौधरी व मुलगा जयेश संतोष चौधरी, सचिन चौधरी व अन्य निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने प्रचंड जल्लोष केलेला आहे. जणू काही भुसावळ शहरातील संतोषभाऊंना मानणाऱ्या त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नवचैतन्य संचारल्याचं चित्र आज दिसून येतंय.निवडणुकीचा निकाल हा खूप दूरचा विषय आहे.परंतु आज संतोष चौधरींना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुसावळचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा प्रचंड ढवळून निघालेले आहे.
ईश्वरबाबूजींनी दिले होते आश्वासन ?
2012 मध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तेव्हाचे जिल्हा बँकेचे चेअरमन ईश्वरबाबू जैन यांनी संचालक असलेल्या संतोषभाऊ चौधरी यांना थेट कारागृहातून जामीन मिळवून जिल्हा बँकेच्या मतदानासाठी बँकेत आणलेले होते. त्याआधी ईश्वर बाबूजी जैन हे बँकेचे अध्यक्ष असताना आणि दोघेही राष्ट्रवादी पक्षाचे नेते असताना मात्र त्यांच्यात तेव्हा विस्तवही जात न होता. मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने दोघांमध्ये बाबूजींनी घेतलेल्या पुढाकारामुळे मनोमिलन घडून आलेले होते. त्याचा परिपाक म्हणून त्यावेळी चिमणराव पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते.
त्याचवेळी ईश्वर बाबू जैन यांनी संतोष भाऊंना 2014 च्या रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवून देण्याचे आश्वासन दिलेले होते,अशी त्यावेळी चर्चा गाजली होती. मात्र संतोषभाऊंना आलेल्या कायदेशीर अडचणींमुळे त्यांची निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी हुकलेली होती.
मात्र आता पुन्हा अकरा वर्षानंतर त्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या असून ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथराव खडसे यांनी निवडणूकीतून तब्येतीच्या कारणास्तव माघार घेतलेली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून खडसेंच्या या निर्णयाबद्दल नाराजी समोर आलेली असून माजी मंत्री सतीश पाटील यांनी थेट खडसेंनी आपल्या सुनेसाठी सोयीचे राजकारण केल्याचा आरोप केलेला आहे. तर एकनाथराव खडसेंनी सतीश पाटील यांचा आरोप हा गैरसमजुन झाल्याचा दावा केलेला आहे.ते बघता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला रक्षा खडसेंच्या विरोधात एक तुल्यबळ उमेदवार संतोषभाऊ चौधरींच्या रूपाने मिळाल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे शरद पवारांनी नाथाभाऊंच्या मर्जीतील उमेदवार न देता म्हणजेच भाजपच्या रक्षा खडसे यांना तगडी लढत देणारा उमेदवार दिला असल्याचे बोलले जात आहे.
या निर्णयामुळे एकनाथराव खडसेंना शरद पवारांनी चेकमेट दिल्याचे बोलले जात आहे. आता येणाऱ्या काळात एकनाथराव खडसे हे संतोष चौधरींचा प्रचार कसा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.ही लढत राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक लढत नक्कीच राहणार आहे.
आ.चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे समर्थक असलेले आणि एकनाथराव खडसेंसह त्यांच्या कुटुंबाचे कट्टर राजकीय वैरी असलेले मुक्ताईनगरचे विद्यमान अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागील आठवड्यात एकनाथराव खडसेंनी सून रक्षा खडसेंचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपशी सेटलमेंट करून उमेदवारी मॅनेज करून घेतली असावी असा दावा केलेला होता. तसेच एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार कशा पद्धतीने करतात त्याच पद्धतीने मी भाजपच्या रक्षा खडसेंचा प्रचार करेल असेही जाहीर केलेले होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष चौधरींच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने आणि चौधरी परिवाराशी आमदार चंद्रकांत पाटलांचे घनिष्ठ संबंध असल्याने रावेर लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. ‘शत्रुचा शत्रू तो आपला मित्र’ मी म्हण ही यावेळी निर्णायक ठरणार आहे. कारण शरद पवारांनी 2019 साली मुक्ताईनगर विधानसभेसाठी एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसेंच्या विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांना जाहीर समर्थन देऊन पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दर्शविलेला होता आता. त्यावेळी राष्ट्रवादीने दिलेल्या ताकदीचे व समर्थनाची चंद्रकांत पाटील हे आपल्याला आता परतफेड करतील अशी आशा कदाचित शरद पवार यांना असावी. तसेच ,रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज झालेले असून काहींनी राजीनामा दिल्याचे समोर आलेय. त्यामुळे खडसेंच्या विरोधातील ॲन्टी इन्कमबन्सीचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो असा कयास शरद पवारांनी लावला असावा.तसेच संतोषभाऊ चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी यांनी रावेर यावल विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत तब्बल ४४००० हजारांचे मताधिक्य घेतलेलं होतं.म्हणजेच भुसावळ, यावल,रावेर आणि मुक्ताईनगर या चार तालुक्यांच्या राजकीय व सामाजिक समीकरणांचा खास विचार करूनच संतोषभाऊ चौधरी यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे एकनाथराव खडसे हे संतोषभाऊ चौधरी आणि ईश्वरलाल जैन या दोघांचेही कट्टर राजकीय वैरी होते.मात्र एक निश्चित आहे की भाजपच्या रक्षा खडसेंना आता तुल्यबळ उमेदवार मिळालेला असून भाजप ऐनवेळी उमेदवार बदलतो का ? तसे झाल्यास संपूर्ण खडसे कुटुंब निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले जाऊ शकते. अशावेळी नाथाभाऊ हे अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे आता फक्त रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच घडामोडींकडे बारीक लक्ष लागून आहे.एक प्रकारे खडसे कुटुंब हे राजकीय चक्रव्यूहात अडकल्याचे चित्र दिसून येतंय.