जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुक्ताईनगर विधानसभेची जागा भाजपला सुटण्याची शक्यता ? आ.चंद्रकांत पाटलांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता !

एका दगडात तीन पक्षी मारण्याचा खडसे विरोधकांचा डाव ?

जळगाव दि-15/10/2024, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून सर्वात मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली असून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीच्या कोट्यातून भाजपला सुटण्याची माहिती समोर आलेली आहे. या चर्चेमुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवारी जालना येथे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवले होते.त्यात त्यांना विधानसभेऐवजी विधान परिषदेवर संधी दिली तर चालेल का ? याबाबत विचारणा झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील तीच आपली पुढची दिशा राहणार असल्याचे सांगितलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यास मी घरी बसायला तयार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याची  माहिती आता सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे.
एका दगडात तीन पक्षी मारण्याचा डाव ?
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात आ. एकनाथराव खडसेंना शह देण्यासाठी तसेच त्यांची कन्या रोहिणी खेवलकर यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आणि व्यूहरचना आखलेली असून त्या दृष्टिकोनातून आता नियोजन केले जात आहे. कारण रोहिणी खडसेंचा पराभव हा एकनाथराव खडसेंचा पराभव मानला जाणार आहे. तसेच एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे हे दोन्हीही वडिल-कन्या जोडी आज रोजी तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच असल्याची माहिती आहे.
तसेच एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार व राज्यमंत्री असल्याने त्यांना भाजपाचच काम करावं लागणार आहे. मंत्री रक्षा खडसे या विधानसभेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रचार करण्याची शक्यता फार कमी असल्याने या ठिकाणी भाजपचा उमेदवार देऊन खडसे परिवाराला गोत्यात आणण्याचा मोठा डाव टाकण्यात येणार आल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण भाजपचा उमेदवार दिल्यास रक्षा खडसेंना भाजपच्या उमेदवारासाठी काम करावचं लागणार आहे. एक प्रकारे त्यांना एकनाथराव खडसे आणि रोहिणी खेवलकर यांच्या विरोधात काम करावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी ही एक मोठी अग्निपरीक्षा असणारच आहे. त्या दृष्टीने अशी रणनीती आखण्यात आलेली आहे. आता या संदर्भात एक दोन दिवसात अंतिम निर्णय होऊन भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याबाबतची सविस्तर माहिती समोर येणार आहे. एक प्रकारे एकनाथराव खडसेंना मुक्ताईनगर मतदारसंघातच रोखण्यासाठी हा मोठा डाव टाकल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघासाठी भाजपकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि भाजपचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदू महाजन हे प्रबळ दावेदार मानले जात आहे. आणि त्यांनी यापूर्वीच मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर सुद्धा केलेले आहे. असे झाल्यास रोहिणी खडसे-खेवलकरांचा मार्ग खूप खडतर होणार असल्याचे संकेत मिळालेले आहे. खडसेंच्या घराणेशाहीला आळा घालण्यासाठी ही व्यूव्हरचना खडसे विरोधकांनी आखल्याचे बोलले जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button