म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताबडतोब जळगावला आलेले होते….इनसाईड स्टोरी
मुक्ताईनगर विधानसभेसाठी चंद्रकांत पाटील आग्रही
जळगाव,दि- ५ एप्रिल, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असून त्याचाच परिपाक म्हणून आज सकाळीच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव यांच्याशी संपर्क करून त्यांना एकनाथराव खडसे हे भाजपात आल्यास आपल्याला येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत चर्चा केलेली होती. त्याचा परिपाक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज धुळ्याला लग्नाला जात असताना अचानक जळगावात वेळ काढून चर्चेसाठी आल्याची माहिती समोर आलेली आहे.
दरम्यान, एकनाथराव खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यास महायुतीत खास करून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात अडचणी निर्माण होतील. माझा गेल्या तीस वर्षांपासून एकनाथराव खडसें विरोधात असलेला राजकीय संघर्ष कायम राहणार आहे. माझे अधिकार अबाधित राहतील याची मला खात्री द्या ,अशी मागणी मुक्ताईनगरचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून आपल्या मनातील भावना कळवली असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव गावात येऊन रावेर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना कशी मदत करता येईल आणि खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील संघर्ष कसा टाळता येईल याबाबत तोडगा काढण्यासाठी आले असल्याची माहिती समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलेलं होतं की, ज्या पद्धतीने एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करतील त्या पद्धतीने मी रक्षा खडसेंचा प्रचार करणार आहे.
दरम्यान ,भविष्यात मुक्ताईनगर विधानसभेची जागा ही महायुतीच्या कोट्यातून शिवसेनेलाच मिळावी यासाठी चंद्रकांत पाटील यांचा आग्रह असल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुक्ताईनगर विधानसभेचे जागा शिवसेनेला मिळावी याची हमी भाजपकडून घेण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते आणि ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण भविष्यात जर का एकनाथराव खडसे भाजपात आले तर त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यासाठी मुक्ताईनगर विधानसभेची जागा भाजपाला मिळू शकते. म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी आतापासूनच भविष्यातील राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. या सर्व घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसतं आहे की, एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश दृष्टीपथात आहे.