आमदार खडसे तब्येत ठिक नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित
एकनाथराव खडसे पक्षासाठी हजर
मुंबई दि-२७ मार्च, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची लोकसभा निवडणूकीतील उमेदवार निश्चित करणेसाठी आज बॅलार्ड पिअर येथील प्रदेश कार्यालयात अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या संसदीय कार्यकारी सदस्यांची तब्बल 11 वाजेपासून सुरू असलेली मॅरेथॉन बैठक आता संपन्न झाली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक उमेदवारांच्या उमेदवारीवरून प्रचंड काथ्याकूट सुरूच आहे. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती आणि रावेर लोकसभेसाठी काही महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर करणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे सुद्धा उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसेंनी ते रावेर लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता तब्येतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. असे असले तरी ते आज पक्षाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते. मात्र अजूनही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नसून रात्री उशिरापर्यंत बैठक चालणार असल्याचे संकेत मिळालेले आहे.
आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे त्यांच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीवरून महाविकास आघाडीत खडाजंगी सुरू झालेली असून काँग्रेसचे नेत्यांनी या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या विरोधात आपली जाहीर नाराजी व्यक्त करून ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला नसल्याचा दावा केलेला आहे.