आ.एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा जयंत पाटलांच्या ‘लालफितीत’ अडकलाय ?
जळगाव:दि-21 जुलै, गेल्या 25 एप्रिल 2024 रोजी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. आणि भाजपात प्रवेश करणार असल्याचे आमदार एकनाथराव खडसेंनी जाहीर केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगाव येथे येऊन गेले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून तो मंजूर करण्यात आला आहे का ? यावर जयंत पाटील यांनी सांगितले होते की, अजून त्याबाबत माहिती नाही, असे बोलून उत्तर देण्याचे टाळलेले होते.
आज पुन्हा ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जळगावात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीच्या महत्वाच्या बैठकीसाठी आले होते. आज पुन्हा पत्रकारांनी एकनाथराव खडसेंनी आपल्याकडे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोपवलेला होता, तो मंजूर केला आहे का ? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की जर एकनाथराव खडसेंनी राजीनामा दिला असेल तर तो माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल, परंतु तो मंजूर झाला का नाही, याच आत्ताच स्टेटस मला सांगता येणार नाही, असे सांगून खडसेंच्या राजीनामा पत्रावर सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा हा जयंत पाटलांच्या ‘लालफितीत’ अडकला आहे का ? एकनाथराव खडसे हे ‘कागदोपत्री’ अजूनही राष्ट्रवादीतच तर नाही ना ? अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. जयंत पाटलांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारात म्हणाले की, तुम्हाला खडसेंची एवढी चिंता का आहे ? असे बोलून या प्रश्नावर सारवासारव केलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमदार एकनाथराव खडसे यांचा भाजप प्रवेश रखडलेला आहे. मध्यंतरी त्यांनी महायुती सरकारवर अनेकदा बोचरी टीका केलेली दिसून आलेली आहे. त्यामुळे खडसे हे भाजपा समर्थक आहे की, अजूनही राष्ट्रवादीतच आहे ? याबाबत अजूनही सस्पेन्स कायम असून एकनाथराव खडसे आज नेमके कोणत्या पक्षात आहे ? हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अजून लक्षात आलेले दिसून येत नाही.