Advertisement
क्राईम/कोर्टजळगावराजकीय

यावल पंचायत समिती कार्यालयात आ.अमोल जावळेंनी अचानक केलेल्या झाडाझडतीने खळबळ; BDO सह काही कर्मचारी अनुपस्थित, कारवाईची मागणी

यापूर्वीही गैरकारभाराच्या अनेक तक्रारी

यावल, दि-06/02/2026, – यावल-रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी आज यावल पंचायत समिती कार्यालयात अचानक भेट देऊन प्रशासनाची धडक तपासणी केली. या तपासणीदरम्यान कार्यालयातील विविध विभागांत धक्कादायक चित्र समोर आले असून, अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर गैरहजर आढळले. विशेष म्हणजे, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड कार्यालयात उपस्थित नव्हत्या आणि त्यांच्या गैरहजेरीबाबत कोणताही रजेचा अर्ज किंवा माहिती उपलब्ध नव्हती.
या प्रकारामुळे आमदार अमोल जावळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “जनतेची कामे प्रलंबित ठेवून अधिकारी बेपत्ता राहणार असतील तर हे अजिबात सहन केले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. स्थानिक नागरिकांकडून गटविकास अधिकाऱ्यांच्या नेहमीच्या गैरहजेरीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रशासनातील ही बेजबाबदार कार्यपद्धती थेट ग्रामीण विकासाच्या कामांवर परिणाम करणारी असल्याचा गंभीर आरोप आमदारांनी यावेळी केला आणि सर्व बेशिस्त अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.
या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत आमदार जावळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याशी थेट संपर्क साधला आणि परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अचानक झालेल्या या तपासणीनंतर पंचायत समितीतील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयात अधिकारी नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल उपस्थित ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावल पंचायत समिती बेशिस्तीचे आणि भ्रष्टाचाराचे माहेरघर बनले असून, येथे शिस्त व प्रशासन नावाची कोणतीही गोष्ट दिसून येत नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद प्रशासन आता या प्रकरणावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार अमोल जावळे यांच्या या पाऊलामुळे प्रशासनातील अनियमितता आणि गैरहजेरीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, ग्रामीण भागातील विकास कामांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांकडून योग्य शिस्त आणि उपस्थितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button