महाराष्ट्रराजकीय
Trending

दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविणार- मुख्य मार्गदर्शक ना. आमदार बच्चू कडू

जळगाव दि.१७ सप्टेंबर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना राबविणार असल्याची ग्वाही ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिली.

महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, दिव्यांग अधिकारी भरत चौधरी, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, संभाजी सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य मार्गदर्शक व आमदार बच्चू कडू म्हणाले, जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात होत आहे.याचा मनस्वी आनंद आहे. पूर्वी दिव्यांगाच्या पाच टक्के राखीव निधी खर्चासाठी आंदोलन करावे लागत होते. आज शासन स्वतः दिव्यांग अभियान राबवित आहे. ज्याला दोन पायी नाहीत त्यांना सशक्त माणसांसोबत लढावे लागते. मूकबधीर बांधवांला अनेक अडचणी आहेत. दहावीनंतर शिक्षणासाठी फक्त चार शाळा आहेत‌. अंधांना अनेक अडचणी आहेत. त्यांचा अभ्यास असला तरी परिक्षेसाठी लेखनिक भेटत नाही. अधिकाऱ्यांनी दिव्यांगासाठी चांगलें काम करावे. त्यांची निश्चितच प्रशंसा होणार आहे. दिव्यांगासाठी आपल्याला प्रचंड काम उभे करायचे आहे. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला थेट पगार मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा चालू आहे.

राज्यात तीन कोटी दिव्यांग बांधव आहेत. तकालानुरूप दिव्यांगासाठी पारंपरिक सायकली वाटप न करता आत ई-सायकली वाटप करण्याची गरज आहे. गावातील चांगल्या लोकांनी एकत्र येत दिव्यांगाचे उद्योग स्थापन व्हावेत यासाठी बचतगट तयार केले पाहिजेत. असे आवाहन ही श्री कडू यांनी केले.

प्रत्येक आमदारांनी आपल्या निधीतून दिव्यांगासाठी ३० लाख रूपये खर्च करण्याची गरज आहे. दिव्यांगांना सहानुभूतीची गरज नसून खऱ्या खुऱ्या मदतीची गरज आहे. असेही श्री कडू यांनी सांगितले.

जिल्ह्यात दिव्यांगांना ई-सायकली वाटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दिव्यांगांना जळगाव जिल्ह्यात सीएसआर फंडाच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत बॅटरीवर चालणाऱ्या २ कोटी रूपयांच्या ई-सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. मात्र या सायकलींच्या माध्यमातून दिव्यांगांनी रोजगार केला पाहिजे.अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ओबीसीमधील विकलांग लोकांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे‌. शासन आपल्या बरोबर आहे. समाजासुध्दा दिव्यांगांकडे आदराने पाहतो‌. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना पगारसुध्दा थेट त्यांच्या बॅंक खात्यावर शासन येत्या काळात वितरित करणार आहे. दिव्यांग मतदारांची लोकशाहीत ताकद मोठी असते. लोक प्रतिनिधींनीना निवडून आणण्याची व पाडण्याची ताकद त्यांच्यात आहे. शासनाने दिलेल्या मदतीचा चांगला उपयोग केला तर तुम्ही तुमचे भले करू शकतात, असे ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी समजून घेण्यासाठी महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी विशेष लोकशाही दिन आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील दिव्यांगांना पेन्शनचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे‌.

आपल्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की, एडीआयपी या योजनेंतर्गत आतापर्यंत ५००० दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वानुरूप अडीच कोटी रूपयांच्या साहित्य साधने व उपकरणांचे वितरण करण्यात आलेले आहे.

यावेळी लाभार्थ्यांच्या वतीने स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रातिनिधिक दिव्यांग लाभार्थ्यांना लाभांचे वितरण

आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी ही मिळाली. यामध्ये जिल्हा परिषद दिव्यांग निधीतून उद्योगासाठी १५ लाख रूपयांची मदत देण्यात आलेले लाभार्थी मिनाक्षी निकम , दिव्यांग प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले लाभार्थी दाम्पत्य हर्षल काशिनाथ गवळी व वनिता हर्षल गवळी, पालकत्व प्रमाणपत्र लाभार्थी नंदकुमार रोकडे, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी संदीप सुनिल कोळी, रोजमीन मजीद ली, बीज भांडवल कर्ज लाभार्थी अरूण ज्ञानेश्वर पाटील, युडीआयडी कार्ड लाभार्थी दिव्या बेहरे,हिमांशी किरण पाटील, दिव्या पुंडलिक पाटील, राजेश शंकर ओझा, एमआर कीट लाभार्थी उमेश जाधव, सारिका शत्रुघ्न पाटील, निकिता संतोष चौधरी, सारंग गोरे, प्रणव पाटील, कर्णयंत्र लाभार्थी देवेश्वरी निलेश माळी, हुमेरा मेहमूद खान पठाण, आधारासाठी काठीचे लाभार्थी शेख अजमद अजीज, पीएम स्वनिधी लाभार्थी वसंत नथ्थू शिंपी, वैयक्तिक कर्ज योजनेचे लाभार्थी बापू प्रभाकर सपकाळे यांना बच्चू कडू यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

दिव्यांगांना भेट, समस्यांचे निवारण

मेळाव्यासाठी उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना समाजकल्याण विभागाने अर्ज वाटप केले होते. त्यावर कुठल्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केलाय, याची माहिती व वैयक्तिक माहितीचा समावेश होता. हे अर्ज घेण्यासाठी स्वतः बच्चू कडू व्यासपीठावरून उतरून त्यांच्याकडे गेले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत हे अर्ज स्वीकारले. दिव्यांगांना कार्यक्रम समजावा, यासाठी दुभाषिकांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

असे होते विविध विभागांचे २५ मदतकक्ष (स्टॉल्स)

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या २५ मदत कक्षांची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार धर्म उद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, यांच्याबरोबरच बार्टी, महाज्योती, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व तसेच विविध सेवाभावी संस्था आदींच्या मदत कक्ष – स्टॉल्सचा समावेश होतो.

या कक्षांच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात आली. योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यात आली.

कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, दिव्यांग सघटनांचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले तर आभार आमदार सुरेश भोळे यांनी मानले‌.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button