पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तडकाफडकी बदली, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
मुंबई ,दि-04/11/24, एकिकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूकीचा कार्यक्रम होईपर्यंत रश्मी शुक्ला यांच्याकडे पदभार असू नये, पोलीस महासंचालकपदी दुसऱ्या योग्य वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे लावून धरली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना आज हटवले असून त्यांच्या जागी तीन अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. निवडणूक तटस्थ होण्यासाठी निवडणूक आयोग आदेश देते की कोणतेही अधिकारी तीन वर्षे एखाद्या पदावर राहिले असतील तर त्यांच्या बदल्या केल्या जाव्यात. याच पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांची बदली केली जावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. रश्मी शुक्ला यांच्या झालेल्या तडकाफडकी बदलीमुळे सत्ताधारी नेत्यांना मोठा दणका बसल्याचे बोलले जात आहे.
DG रश्मी शुक्लांना का हठवले ?
1988 च्या बॅचच्या रश्मी शुक्ला या आयपीएस आहेत. महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत रश्मी शुक्ला यांचं नाव वर आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक नेते आणि मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. आताही रश्मी शुक्ला यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी आक्षेप घेतला. जून 2024 लाच रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपत असताना तो जानेवारी 2026 पर्यंत वाढवण्यात आला. ही बढती नियमबाह्य असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं.