बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने स्वतःहून घेतली दखल, सु-मोटू दाखल, आज सुनावणी
ठाणे -21/08/2024, जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत बालवाडीच्या दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असून न्यायालयाने संताप व्यक्त करत या याचिकेचे सुमोटू याचिकेत रूपांतर केले आहे. याबाबत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आज गुरुवारी सकाळी 10:30 वाजता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागून असून राज्यातील शिक्षण क्षेत्रात घडत असलेल्या महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या यापूर्वी घालून दिलेल्या उपाययोजनांची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या आठवड्यात पुणे, अकोला, नागपूर आणि ठाणें जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या शाळा व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कारभारावर सुद्धा न्यायालय ताशेरे ओढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बदलापूर येथील एका शाळेत गेल्या आठवड्यात बालवाडीतील दोन मुलींचा लैंगिक छळ झाल्याची घटना घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्याने केली होती.
दिनांक 13 ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात ही घटना घडली होती . प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नुसार, पालकांनी 16 ऑगस्ट रोजी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पिडीत कुटुंबाने सांगितले होते की, त्यांच्या तक्रारीनंतर 11 तासांनी पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होऊन बदलापुरात 8 तास रेल रोको आंदोलन करण्यात आले होते.
17 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अक्षय शिंदे या 23 वर्षीय शाळेतील परिचराला दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती. स्थानिक न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
या घटनेमुळे राज्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेक आंदोलनेही होत आहेत. रेल रोको निदर्शने आणि हिंसाचाराच्या संदर्भात अनेकांना अटक करण्यात आली आहे.