भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्वाधार योजनेचा विस्तार आता तालुकास्तरापर्यंत- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
मुंबई दि. 26 : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो तालुकास्तरावरील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून स्वाधार योजनेचा विस्तार (व्याप्ती)तालुकास्तरावर करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. याबाबतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी मंत्रालयात विभागाचा कार्यभार स्वीकारला व विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी श्री. शिरसाट बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सहसचिव सो.ना.बागुल यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री श्री शिरसाट म्हणाले की, स्वाधार योजनेची व्याप्ती आता तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात येत आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांमध्ये सुटसुटीतपणा आणत आहोत. ५० टक्के वरील पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेप्रमाणे लाभ दिला जाणार आहे. तसेच प्रथमच अनुसूचित जाती प्रवर्गातील तृतीयपंथींयानाही योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही श्री. शिरसाट यांनी सांगितले.
मंत्री श्री. शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याची सूचना केली. विशेषत: या विभागांतर्गत येणाऱ्या वसतिगृहाच्या सोयीसुविधाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. वसतिगृहाच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी वसतिगृहाना भेटी देण्यात येणार आहेत. विभागाच्या योजना आणि महामंडळाच्या योजनांचा लाभ योग्य त्या लाभार्थ्यांना देण्यात यावा असेही मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी सांगितले.