भुसावळातील ‘त्या’ वाईन शॉपमध्ये अल्पवयीन बालकाचा वापर केल्याप्रमाणी कारवाई करण्याचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
भुसावळ दि-24/10/2024, शहरातील जामनेर रोडवर असलेल्या मधुर वाइन शॉप मध्ये एक अल्पवयीन मुलगा दारू विक्री करीत असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव व राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली होती. त्या अर्जाची दखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क ,जळगाव कार्यालयाला सदरील विषयासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील जामनेर रोडवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मधुर वाइन शॉप मध्ये एक अल्पवयीन मुलगा कामाला असून तो दारूची विक्री करीत असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना दिसून आल्याने त्याबाबत सानप यांनी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय ,जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या पत्राची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.असे पत्र केदारनाथ सानप यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २२/१०/२०२४ रोजी प्राप्त झालेले आहे. याबाबत केदारनाथ सानप यांनी सादर केलेले पुरावे बघता सदरील वाईन शॉपचा परवाना रद्द होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.