Advertisement
राजकीय

भोपालमध्ये गोळीबार करून फरार आरोपी भुसावळ बसस्थानका जवळ गावठी पिस्टलसह जेरबंद; बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

भुसावळ – भुसावळ शहरातील बसस्थानक परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने  भुसावळ बस स्थानकाजवळ गावठी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. आरोपीकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल (कट्टा) व मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.


पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी भुसावळ शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की भुसावळ बसस्थानकाच्या गेटजवळील रिक्षा स्टँड परिसरात एक इसम गावठी पिस्टलसह संशयास्पदरीत्या फिरत आहे. त्यानुसार डी.बी. पथकाने तात्काळ सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले.
तपासात आरोपीचे नाव शादाब रईस कुरेशी (वय ३५, रा. बाग फरहत अफजा, हुजूर सिकंदरी, भोपाल – मध्यप्रदेश) असे असल्याचे समोर आले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी पिस्टल व मॅगझीन जप्त करण्यात आले.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १२१/२०२६ नोंदवून आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीबाबत भोपाल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी भोपाल शहरातील रेकॉर्डवरील निगराणी गुन्हेगार असून १४ मार्च २०२६ रोजी अशोका गार्डन पोलीस स्टेशन हद्दीत त्याने पिस्टलने एका व्यक्तीवर गोळीबार करून फरार झाला होता. या प्रकरणी त्याच्यावर तेथेही गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती अशोका गार्डन पोलीस स्टेशन, भोपाल येथे कळविण्यात आली आहे. ही कारवाई म.पो.उपनिरीक्षक भारती काळे, पो.हे.कॉ. विजय नेरकर, अतुल पवार, सोपान पाटील, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत सोनार, जीवन कापडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपुरकर, जावेद शहा, योगेश माळी आणि अमर अढाडे यांच्या पथकाने केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय बळिराम नेरकर हे करत आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button