Advertisement
जळगावनिवडणूकमहाराष्ट्रराजकीय

विधानसभेतील तीन पराभूत उमेदवार यंदाच्या निवडणुकीपासून अलिप्तवादी ? कार्यकर्ते संभ्रमात !

भुसावळ -दि-१४/११/२५ , जळगाव जिल्ह्यातील १८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असून राजकीय नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. यातच आता काही नगरपरिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी भाऊगर्दी सुरू केलेली आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी सध्या वादळापूर्वीची शांतता पसरलेली असून उमेदवारी अर्ज पाहिजे त्या प्रमाणात दाखल होत नसल्याने, उद्या किंवा सोमवारी शेवटच्या दिवशी सर्वाधिक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.
विधानसभेतील उमेदवार झाले ‘अलिप्तवादी‘ ?
यावल-रावेर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले होते. यावेळी त्यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांचे थोरले बंधू भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी त्यांना त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता समोर मिळालेल्या माहितीनुसार अनिल चौधरी यांचे रावेर आणि भुसावळ नगरपरिषद अशा दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत नाव असल्याचे बोलले जात असून, ते रावेरला त्यांच्या समर्थकांना समर्थन देणार की भुसावळ मधील समर्थकांना समर्थन देणार ? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून आहे. सध्या तरी ते भुसावळच्या राजकारणात पडद्यामागून हालचाली करून माजी आमदार संतोष चौधरी यांच्या पाठीशी उभे राहून रणनीती आखणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.मात्र ते कोणती भूमिका जाहीर करणार ? हे लवकरच समोर येणार आहे.
तर दुसरीकडे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भुसावळ येथून डॉ राजेश मानवतकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झाले होते. मात्र त्यांनी तब्बल 60,000 मते मिळवून पक्षश्रेष्ठींसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विधानसभेत मिळालेल्या याच 60,000 मतांच्या जोरावर आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दावेदारी केलेली दिसून येत आहे. मात्र डॉ मानवतकर दाम्पत्य सध्याच्या निवडणूकीपासून अलिप्त असल्याचे चित्र दिसून आले आहे. या संदर्भात आता महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी ही जागा कोणाला सुटते यासंदर्भात सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे माजी आमदार संतोष चौधरी यांनी त्यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत.
दरम्यान, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी एकनाथ खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवून पराभव झाल्या होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचे पती प्रांजल खेवलकर हे पुण्यातील एका कथित ड्रग्स प्रकरणात अडकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मोठी कायदेशीर अडचण निर्माण झाली होती.तेव्हापासून त्या राजकारणापासून दूर असल्याचे बोलले जाते.
वरील तिन्ही राजकीय कार्यकर्ते हे आपापल्या मतदारसंघात प्रभावशाली मानले जातात,मात्र यावेळी आजपर्यंत तरी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही हालचाल केलेली दिसून आलेली नाही, त्यामुळे त्यांची यावेळी काय भूमिका राहणार ? याकडे तिनही मतदार संघातील त्यांच्या समर्थक मतदारांचे लक्ष लागून आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button