राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे यांनी दिला पदाचा राजीनामा, भुसावळात राष्ट्रवादीला मोठे खिंडार
भुसावळचे नगराध्यक्षपद राखीव राहण्याची शक्यता ?

भुसावळ शहरातील माजी नगरसेवक रवी सपकाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना दिल्याने भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठे भंडार पडलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, आणि शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी ) यांच्याकडून सापत्न आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप रवी सपकाळे यांनी केला आहे.
भुसावळचे माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी महायुतीत येण्यास खूप उशीर केला असल्याचे मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलेलं आहे. तसेच माझ्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी मला निधी उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे मी राजीनामा देत असल्याचा दावा रवी सपकाळे यांनी केलेला आहे.तसेच आगामी भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक ही भाजप विरुद्ध माजी आमदार संतोषभाऊ चौधरी अशीच ही थेट लढत राहणार आहे. माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सामाजिक न्याय विभागाचे समर्थक आणि सहा तालुक्यांचे तालुकाध्यक्ष यांचेसह कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहे. आणी यापुढे फक्त संतोषभाऊ चौधरी यांच्यासोबतच राहून कायमस्वरूपी काम करणार असल्याचे रवी सपकाळे यांनी सांगितले आहे.
नगराध्यक्षपद SC राखीव राहण्याची शक्यता ?
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून आता आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद देखील अनुसूचित जातीसाठी राखीव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने आता भुसावळ शहरातील अनुसूचित जातीच्या माजी नगरसेवकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या वातावरणाची तयारी सुरु केलेली असून आता नगरपरिषद निवडणुकीचा धुराळा उडाल्याचे दिसून येत आहे.













