बनावट शालार्थ आयडी वापरून भरती झालेल्या राज्यातील शिक्षकांच्या प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
जळगाव जिल्ह्यातील काही संस्थाचालक, शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

मुंबई, दि.-०१/०७/२५: नागपूर विभागात शालार्थ प्रणालीच्या लॉगिन आयडीचा गैरवापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपासणी पथक तसेच शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली आहे. विधानसभेत सदस्य अजय चौधरी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत सदस्य नरेंद्र भोंडेकर, प्रशांत बंब, काशिनाथ दाते, प्रवीण दटके, सुरेश भोळे, मुफ्ती महोम्मद इस्माईल अब्दुल खालिक या सदस्यांनी सहभाग घेतला.
मंत्री दादा भुसे म्हणाले की, यामध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालण्यात येणार नाही. आतापर्यंत या प्रकरणात १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी, संस्था चालक आणि संचालक यांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समितीची स्थापना करण्यात आली आहे.या समितीत आयएएस, आयपीएस आणि निवृत्त न्यायाधीश यांचा समावेश राहील. तसेच ही समिती संपूर्ण राज्यातील संशयित प्रकरणांची तीन महिन्यांत जलद चौकशी करून सरकारकडे अहवाल सादर करेल, तसेच बोगस पद्धतीने कागदपत्रे सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सर्व संबंधित घटकांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्यासह अदा केलेल्या फरकांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली आहे.













