कोल्हापूरची नुतनीकृत चित्रनगरी मे २०२४ पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 11 : कोल्हापूर येथील चित्रनगरीतील विकास कामे वेगाने मार्गी लावून नूतनीकृत चित्रनगरी मे-2024 पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करून द्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात कोल्हापूर चित्रनगरीच्या नूतनीकरण आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदिगरे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, वास्तू विशारद इंद्रजित नागेशकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कोल्हापूर चित्रनगरी येथे सुरु असलेल्या विविध कामांसंदर्भातील सादरीकरण व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील यांनी केले. यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी त्या अनुषंगाने विविध कामांची तपशीलवार माहिती घेतली. कोल्हापूर येथील चित्रनगरीतील प्रस्तावित विकास कामांमध्ये चित्रीकरणासाठी बंगला, चाळ, नवीन वाडा, मंदिर, तीन वसतिगृहे, अद्ययावत रेल्वे स्थानक, दोन नवीन बंदिस्त स्टुडिओ अशी चित्रीकरण स्थळे, अंतर्गत रस्ते, वीज व पाणी पुरवठा, मलनि:स्सारण अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर पर्यटानाला चालना देणारे विविध उपक्रम आणि स्थळेही येथे विकसित करण्यात येणार आहेत. चित्रीकरणासोबतच येथे पर्यटनाला चालना मिळेल, अशा पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराला संधी उपलब्ध होण्याबरोबरच राज्यातील चित्रपट व मालिका निर्मिती संस्थांसाठी ही दुसरी चित्रनगरी चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे येथील विकासालाही अधिक चालना मिळेल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.