राज्यपाल नियुक्त १२ आमदारांविषयी नवीन अपडेट समोर,राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवा ट्विस्ट !
अनेकांना आमदारकीच्या लॉटरीचे वेध
मुंबई दि-९ फेब्रुवारी, मागील गेल्या तीन वर्षांपासून वादग्रस्त ठरलेल्या आणि न्यायालयीन प्रक्रियेत रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील प्रलंबित सुनावणीसाठी वेळ द्यावा, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी २२ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात देखील वेळेअभावी होऊ न शकल्याने सुनील मोदी यांनी आज उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्यासाठी अर्ज सादर केलेला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला होता, मात्र ऐनवेळी याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्याने तो निर्णय पुन्हा प्रलंबित राहिलेला आहे.
दरम्यान,राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र,राज्यपाल भगतसिंग कोशारींनी त्याबाबत कोणताच निर्णय न घेता तो प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता. त्याची कोणतीही दखल घेतली गेली नव्हती. जवळपास गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण हे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेलेच आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अर्थात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने पुन्हा नवीन यादी सादर करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, यावर ठाकरे गटाच्यावतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांची ही कृती नियमांमध्ये बसत नसल्याचं सांगत तेव्हा त्यावरती आक्षेप घेण्यात आला होता.
राज्यपालांचा हा निर्णय बेकायदा असून महाविकास आघाडीने दिलेल्या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करावी, अन्यथा ही यादी मागे घ्यायची असल्यास त्याची सविस्तर कारणे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी याचिकेद्वारे हायकोर्टात केली होती. त्यानंतर त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मात्र, २२ डिसेंबर नंतर याप्रकरणी कोणतीच सुनावणी झाली नाही.
आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रकरणासंदर्भात सुनावणीसाठी वेळ द्यावा, यासाठी विनंती याचिका सुनील मोदी यांनी आज हायकोर्टात दाखल केली आहे. मागच्या दाराने आमदारकी मिळवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा या जागांवर नेहमी डोळा असतोच, विशेष म्हणजे आता याच महिन्यात २६ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुकीची धामधूम असताना आता हे विधान परिषदेच्या १२ आमदार नियुक्तीचे जुने प्रकरण चर्चेत आलेलं आहे. या प्रकरणाची पुढील आठवड्यात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता असून या सुनावणीकडे राज्यातील सर्वच राजकीय क्षेत्राचे बारीक लक्ष लागलेलं आहे.
जागांचा फडणवीस-शिंदे-पवार ६-३-३ असा फाँर्मुला
सध्याच्या अस्तित्वात असलेल्या सरकारमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा समावेश असल्याने आता सध्याच्या स्थितीत असलेल्या आमदारांच्या आकडेवारीनुसार भाजप ६ , शिवसेना एकनाथ शिंदे गट ३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या ३ अशा एकूण १२ नवीन नावांच्या प्रस्तावाची यादी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.