सर्वच पक्षांच्या लोकसभा उमेदवारांच्या जागेचा ‘ वाटाहिस्सा ‘ होणार फायनल, बंडखोर करणार ‘वजाबाकीचे’ राजकारण
मनोज जरांगेंचा 'मराठा फॅक्टर' निर्णायक
मुंबई दि-२१, लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजलेले असून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजपाने आघाडी घेतलेले दिसतेयं. भाजपाने आतापर्यंत दोन टप्प्यातील लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या असून आतापर्यंत 80 टक्के जागांचे उमेदवार भाजपने जाहीर केलेले आहे. असे असताना राज्यात मात्र महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार घोषित केलेले नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येतयं.
कदाचित बंडखोरीच्या धाकामुळेच महाविकास आघाडी आणि महायुतीतील इतर घटक पक्ष हे उमेदवार जाहीर करत नसल्याचे बोलले जात आहे.
उमेदवारांची यादी जाहीर केल्यास आणि त्यातही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले गेल्यास बंडाळी उफाळून येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतलेली दिसतेयं.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे काही ठिकाणी सक्षम उमेदवार मिळत नसल्याने महायुतीतील नाराज बंडखोरांना गळाला लावून तिकीट देण्याची काहीशी रणनीती काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केली असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक वेळी अंतिम बैठक होती असे सांगून पुन्हा नवीन बैठक घेऊन सुद्धा जागा वाटपाचा तिढा आणि पेच अजून सुटलेला दिसत नाही.
येत्या 24 तासात सर्वांची यादी होणार जाहीर
निवडणूक आयोगाने 21 मार्चपासून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली असून अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे समोर आलेले नाही.
मात्र येत्या 24 तासाच्या आत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची यादी समोर येणार असून त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र उमेदवारांसमोर सर्वात मोठा चिंतेचा विषय हा बंडखोरांचा राहणार असून बहुतेक ठिकाणी बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात खास करून महायुतीतील घटक पक्षांना याचा जबर फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून काही ठिकाणी बंडखोर हे वजाबाकीचे राजकारणात करण्यात पेटून उठलेले असून ते विजयाचं गणित बिघडणार हे मात्र आता स्पष्ट दिसून येतं आहे.
काही ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक हे अतिरिक्त मराठा उमेदवार अर्ज भरणार असल्याने हा ‘मराठा फॅक्टर’ खूपच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यांच्याच हातात अनेक उमेदवारांचा विजय अवलंबून असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आलेले आहे.