जळगावात बनावट दारूचा मोठा कारखाना उद्ध्वस्त, आयुर्वेदिक औषधे निर्मिती कंपनीचा गोरखधंदा उघड
50 लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव- औद्योगिक वसाहतीत असलेल्या के-१० सेक्टरमध्ये आयुर्वेदिक औषधी व शीतपेय उत्पादन कंपनीच्या नावाखाली बनावट देशीदारू बनविण्याचा कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाचे विभागाच्या वतीने शनिवारी ४ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजता छापा टाकून अंदाजे ५० लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ५ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुकीचा फायदा घेत एमआयडीसी भागात असलेल्या के-१० येथील मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट या कंपनीत शीतपेय बनविण्याच्या नावाखाली बनावट देशीदारू बनवून त्याची बाजारात बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने शनिवारी ४ मे रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास मंदार आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीत छापा टाकला. दरम्यान पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आतून दार बंद करून घेतले होते. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत बनावट देशीदारू बनवण्याचा कारखाना उध्वस्त केला. या ठिकाणी दारू पॅकिंगसाठी लागणारे रिकामी बॉटल्स, 32 बॅरेल तयार असलेली दारू, मशीनरी सामान आणि ५ जणांना पोलिसांनी घेतले आहे. हा मुद्देमाल जवळपास ५० लाख हुन अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ९ वाजता या कंपनीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान या ठिकाणाहून बनावट देशीदारू हा कोणत्या ठिकाणी गेला आहे, त्या ठिकाणची देखील चौकशी करून जिल्ह्यात वितरण करण्यात आलेला मुद्देमाल मागवण्यात यावा, अशा देखील सूचना जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.या कारवाईमुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात बनावट दारूच्या निर्मितीचा सुळसुळाट दिसून येत आहे.