PM आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत 84,454 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे हस्ते मंजुरी आदेश

जळगाव, दि-22/02/25– प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले एक सुंदर आणि सुरक्षित घर असावे. सामान्य माणसाचे हे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असून जळगाव जिल्ह्याला या योजनेत सर्वाधिक घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार चारशे चौपन्न लाभार्थ्यांना घराच्या बांधकामासाठी पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी पंधरा हजार रुपये वितरित करण्यात आले. ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर एकेऐंशी हजार आठशे अठ्ठावन उद्दिष्टांपैकी चौऱ्याऐंशी हजार चारशे चौपन्न लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण आणि घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम नियोजन भवन, जळगाव येथे पार पडला. या कार्यक्रमात मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते निवडक पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देण्यात आले.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक राजीव लोखंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचा संदेश
पालकमंत्री गुलाबराव पाटील काही अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, जिल्ह्यात ज्या लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली आहेत, त्यांनी निर्धारित मुदतीत गुणवत्तापूर्ण घरे बांधावीत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांचा हा संदेश प्रकल्प संचालक राजीव लोखंडे यांनी उपस्थितांपर्यंत पोहोचवला.
जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, हे अनुदान लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात आले आहे. लाभार्थी स्वतःच्या बचतीतून किंवा बँकांकडून कर्ज घेऊन अधिक मोठे घर बांधू शकतात. साधारणतः एक घर बांधण्यासाठी बहात्तर दिवस लागतात, त्यामुळे मान्सूनपूर्वी घरे पूर्ण करण्याचे त्यांनी आवाहन केले.
राज्यस्तरीय डिजिटल वितरण कार्यक्रम
पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राज्यभरातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता डिजिटली वितरित करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संपूर्ण राज्यभर करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील अठ्ठावन ग्रामपंचायतींसह तालुकास्तरीय आमदारांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. तसेच, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भाषण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील लाभार्थ्यांनी ऐकले.