महामार्गावरील पुलाच्या कामासाठी नदीत शेकडो डंपर मुरूम टाकलाय ! पाटबंधारे विभागाने आज बजावली नोटीस, आ.चंद्रकात पाटील आक्रमक
ठेकेदार बी एन अग्रवाल यांच्याकडून मनमानी

जळगाव ,दि-२७/०३/२०२५, मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावाजवळील इंदोर हैदराबाद जोडमहामार्ग क्रमांक NH 753 L दरम्यान पूर्णा नदीवर गेल्या काही सात आठ महिन्यांपासून मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र बांधकाम करताना पूर्णा नदीत बांधकाम सुरू करण्याआधी या महामार्गाचे कंत्राटदार बी. एन. अग्रवाल पाटबंधारे विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, मनमानी पद्धतीने शंभरच्या वर डंपर भरून मुरमाचा भराव टाकून काम सुरू केलेले होते. हतनूर धरणात आधीच 53% गाळ असून तो काढण्यासाठी गेला कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू असताना तो गाळ काढण्याचे सर्व प्रयत्न शासन दरबारी आधीच निष्फळ ठरलेले असताना एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर पूर्ण नदीत भराव टाकल्याने, गाळाच्या प्रमाणात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहेच. तसेच हतनूर धरणावरून अनेक घरगुती व औद्योगिक वापराबाबतच्या अनेक योजना मंजूर आहेत. सदरील मुरूमाच्या भरावामुळे पाणीटंचाईचा व पूर फुगवट्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत “मिडियामेल” न्यूज ने यापूर्वीच ४ डिसेंबर २०२४ रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित केलेले होते.
याप्रकरणी संबंधित जळगाव पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता अदिती कुलकर्णी यांना विचारपूस केली असता त्यांनी याबाबत कंत्राटदार अग्रवाल यांनी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचे डिसेंबर महिन्यात सांगितलेले होते. यानंतर त्यांचे कनिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, सावदा यांनी दिनांक २१/१२/२०१४ रोजी क्षेत्रीय भेट दिली. सदर कामाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, खंडवा अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग NH ७५३ L चे शहापूर बायपास ते मुक्ताईनगर सेक्शन च्या किमी १८०.००० ते २१६.२७८ चे मध्य प्रदेश / महाराष्ट्र राज्यात भारतमाला परियोजने अंतर्गत Hybrid Annity Mode वर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदर कामांतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे किमी २१० +९२० येथे मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. सदर पुलाच्या कामासाठी हतनूर धरणाच्या जलाशयात पूर्णा नदीपात्रात मुरमाचा भराव करण्यात आलेला असून सदर कामाच्या ठिकाणी पूर्णा नदीच्या पात्रात मध्यभागी ३५ मीटर अंतर सोडून मुरमाचा भराव करण्यात येत आल्याचे क्षेत्रीय पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी, सावदा यांच्या निदर्शनास आले. तसेच क्षेत्रीय स्थळी उपस्थित सदर कामाच्या कंत्राटदाराच्या उपस्थित प्रतिनिधी यांना विचारणा केली असता, त्यांनी सदर काम राष्ट्रीय प्राधिकरण विभाग, खंडवा अंतर्गत सुरू असून कामाचे कंत्राटदार श्री. बी. एन. अग्रवाल भुसावळ, यांचेमार्फत सुरू असून कामास ०३ महिन्याचा कालावधी लागणार असून नदीपात्रातील पुलाच्या पिलर चे काम पूर्ण झाल्यावर पूर्णा नदीपात्रात करण्यात आलेला मुरमाचा भराव पावसाळ्यापूर्वी टप्प्याटप्प्याने काढण्यात येऊन पूर्णा नदीचे पात्रातील पाणी प्रवाह मोकळा करण्यात येणार असल्याचे कंत्राटधाराचे प्रतिनिधी यांनी सांगितल्याचे नमूद केलेले आहे.

सदर कामाचा पुलाच्या कामासाठी हतनूर जलाशयात करण्यात येत असलेल्या Division Dt. 01/03/2025 Page 57 भरावा करीता हतनूर धरणाशी संबंधीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत जळगांव पाटबंधारे विभाग,जळगांवशी अथवा विभागांतर्गतच्या क्षेत्रीय कार्यालयाशी कोणत्याही लेखी अथवा तोंडी संपर्क करून कामास कोणतीही ना हरकत अथवा परवानगी घेण्यात आली नसल्याचे संबंधित कंत्राटदराच्या प्रतिनिधीस समक्ष अवगत करण्यात आले आहे.
विधीमंडळात आवाज उठविणार -आ. चंद्रकांत पाटील
याबाबत आता पाटबंधारे विभागाने आज संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नोटीस जारी केलेली आहे. मात्र पाटबंधारे विभागाने इतके दिवस याबाबत कार्यवाही सुरू करण्यास उशीर का केला ? असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. तर दुसरीकडे संबंधित कंत्राटदार बी एन अग्रवाल यांनी मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात टाकलेल्या मुरमाच्या भरावाची रॉयल्टी भरणा केली आहे का ? असाही प्रश्न आता उपस्थित झाला असून महसूल विभाग याबाबत चौकशी करणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. याबाबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी, प्रतिक्रिया देताना सांगितलेले आहे की, सदरील कंत्राटदार पहिल्या दिवसापासूनच मनमानीपणे कारभार करत असून , प्रशासन सुद्धा त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे.महामार्गालगतच्या शेकडो मोठ-मोठ्या डोंगर टेकड्या पोखरून शेकडो डंपर मुरूम काढलेला असून त्याबाबत महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी आता कारवाई न केल्यास, याबाबत पुढे विधिमंडळात याविषयी आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.