एसटी बस रस्त्यात बंद पडल्यास दुसऱ्या येणाऱ्या बसने मोफत प्रवास, बस न थांबवणाऱ्या चालकांवर होणार कारवाई
बस न थांबविल्यास करा तक्रार

जळगाव दि- ३०/०३/२०२५ , महाराष्ट्रातील सर्व प्रवाशांची लाडकी एस.टी अर्थात राज्य परिवहन बसचा मार्गस्थ बिघाड, अपघात इत्यादी कारणांमुळे मार्गात खोळंबा झाल्यास प्रवाशांना त्यांच्या नियत वेळेत नियत ठिकाणी पोहोचण्यास बाधा निर्माण होते. परिणामी त्यांचे पर्यावसन प्रवासी तक्रारी निर्माण होण्यावर होते.त्यामुळे अशा प्रकारे तक्रारी उद्भवू नये याकरिता निम्नश्रेणी सेवेची बस अपघात /मार्गस्थ बिघाड इत्यादी कारणांमुळे मार्गात बंद पडल्यास व त्याच मार्गावरुन उच्च श्रेणी सेवेची बस आल्यास खोळंबलेल्या प्रवाशांना उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास अनुज्ञेय करणेबाबत संदर्भिय परिपत्रकाव्दारे यापूर्वीच सर्व विभागांना सूचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.सदर प्रवास अनुज्ञेय करतांना कोणताही अधिकचा आकार, प्रवासभाडे फरक आकारणी न करणेबाबत देखील सूचित करण्यात आलेले आहे. मात्र आगारातील चालक-वाहकांकडून वरील परिपत्रकातील सूचनांचे पालन न करता प्रवाशांना प्रवास नाकारला जात असलेबाबत तक्रारी मध्यवर्ती कार्यालयास प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने आपणांस पुनःश्च कळविण्यात येते की,संदर्भित परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात याव्यात व त्याची नोंद दफ्तरी ठेवण्यात यावी. तसेच चालक – वाहकांच्या माहितीकरिता परिपत्रकाची प्रत सूचना फलकावर प्रसारित करण्यात यावी. अशाप्रकारच्या तक्रारी उद्भवणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात यावी.याबाबत दि-१७/०३/२०२५ रोजी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे आदेशित करण्यात आले आहे.